शिवना : शिवना येथील रहिवासी पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांना रबीची पिके घेता आली नाहीत. शिवाय गावातील निजामकालीन साठवण तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. त्यामुळे तलावाची साठवण क्षमता कमी झाली. ही बाब निदर्शनास येताच गावकऱ्यांनी लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्यास एक महिन्यापासून सुरुवात केली. आतापर्यंत सुमारे २० हजार ब्रॉस गाळ काढण्यात आला आहे.येथील निजामकालीन तलावातील गाळ काढण्यासाठी गावातील शेकडो शेतकऱ्यांनी उर्त्स्फू त सहभाग नोंदविला आहे. दोन जेसीबी, चारशे ट्रॅक्टरच्या माध्यमातून रोज शेकडो ब्रास गाळ काढण्यात येत आहे. शेतकरी हा गाळ काढून आपल्या शेतात नेऊन टाकत आहेत. शिवना येथील गावतलाव निजामकालीन असून, तलावाच्या निर्मितीनंतर पाऊस, सांडपाणी व अन्य माध्यमातून तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तलावातील साठवण क्षमता कमी झाली आहे. गावासह आजूबाजूच्या परिसरातील शेतीला पिण्याच्या पाण्यासाठी हा तलाव महत्त्वाचा होता. या तलावात निम्म्याहून अधिक प्रमाणात गाळ साचल्याने तलावाची साठवण क्षमता कमी झालेली आहे.२००२ मध्ये शिवना येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. तेव्हा पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तत्कालीन आमदार स्व. किसनराव काळे यांच्या पुढाकाराने अमृत जलधारा अभियानांतर्गत या तलावातील गाळ काढण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी व्ही. राधा यांनी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर २००३ मध्ये या तलावाचा जलसाठा वाढल्याने पाणीटंचाईवर मात करण्यात गावकरी यशस्वी झाले होते.२००४ मध्ये महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाची शिवना- मादणी संयुक्त पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. परिणामी, २००४ पासून गावतलावाकडे दुर्लक्ष झाले होते. या वर्षी शेतकऱ्यांनी पुढाकार घेत शिवना तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला. लोकसहभागातून एक महिन्यापूर्वी ही मोहीम सुरू झाली. परिसरातील खडकाळ जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा पोत सुधारण्याच्या उद्देशाने स्वखर्चाने या तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली. आता गाळ काढून नेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे. तेथे दोन जेसीबी, एक पोकलेन आणि चारशे ट्रॅक्टरच्या साहाय्याने जवळपास २० हजार ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला आहे.
लोकसहभागातून गाळ उपसा
By admin | Updated: April 16, 2016 01:44 IST