उस्मानाबाद : भूम तालुक्यातील आठ चारा छावणी चालकांनी निकषाची पूर्तता न केल्याप्रकरणी संबंधितांना जिल्हा प्रशासनाने तब्बल १ कोटी ६१ लाख ४१ हजार १०७ रुपयांचा दंड ठोठावला आहे़ यापुढील कालावधीतही जिल्ह्यातील जे चारा छावणी चालक निकषाची पूर्तता आणि नियमांचे पालन करणार नाहीत, अशांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे़ याशिवाय भूम तालुक्यात प्रशासनाने शेतकऱ्यांनी अधिकाधिक जनावरे छावणीत दाखल करावीत, यासाठी ‘स्वागत अभियान’ राबविण्यास सुरूवात केली असून, या अभियानास शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभत आहे़जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन व चाऱ्याची उपलब्धता पाहता मंडळनिहाय आणि तेथील पशुधन विचारात घेऊन प्रशासनाने छावण्यांना मंजुरी देण्यात येत आहे़ भूम तालुक्यात सध्या ३१ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे़ या छावण्यांमध्ये दैनंदिनरित्या विविध शासकीय योजनांची माहिती देणे, छावणीतील जनावरांची तपासणी, त्याचबरोबर तेथे असलेल्या पशुपालकांचीही आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय भूम तालुक्यातील चारा छावण्यांमध्ये अधिकाधिक पशुपालक, शेतकऱ्यांनी जनावरे आणावीत यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत अभियानही राबविण्यात येत आहे़ याला शेतकरी, पशुपालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़याचबरोबर तालुक्यातील चारा छावण्यांची तपासणी सुरू आहे़ यात रेकॉर्ड, शेड उभारणी, जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्यात बदल न करणे, अॅझोला आणि हायड्रोफोनिक्स नसणे, कडबाकुट्टी नसणे,चाऱ्याची रक्कम धनादेशाने न वाटणे, शेणाची विल्हेवाट आणि जनावरांची वाढीव संख्या दाखविणे अशा कारणावरून आठ चारा छावणी मालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये हाडोंग्री येथील चारा छावणीस ७८ लाख ७७ हजार ६३४ रुपये, वडमाऊली येथील छावणीस २२ लाख ६२ हजार ७३२ रुपये, कपिला चारा छावणीस ८ लाख ३२ हजार ९७४ रुपये, ज्योतीबाचीवाडी येथील छावणीस २५ लाख ४६ हजार ८३५ रुपये, आंदरुड येथील छावणीस ६ लाख ६३ हजार ६३२ रुपये, हिवर्डा येथील छावणीस ६ लाख ७६ हजार ५४४ रुपये, जेजला येथील छावणीस ६ लाख ६९ हजार २३७ रुपये, आनंदवाडी येथील छावणीस ५ लाख ८४ हजार ५१९ रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. (वार्ताहर)
सहा छावणी चालकांना दंड
By admin | Updated: January 5, 2016 00:07 IST