छत्रपती संभाजीनगर : अज्ञात विकृतांनी कुत्र्यांना वीषारी पदार्थ लावलेले ब्रेड, बिस्किट खाऊ घालून त्यांची हत्या केली. पहाडसिंगपुऱ्यात गुरूवारी उघड झालेल्या घटनेत जवळपास एका पाळीव कुत्र्यासह ९ भटक्या कुत्र्यांचा समावेश आहे. यात चार पिल्लांचा समावेश आहे. रस्त्यावर विषामुळे मृत्यूमुखी पडलेले पिल्ले पाहून मात्र पहाडसिंगपुऱ्यातील नागरिक हळहळले होते.
शहर पोलिस दलात कार्यरत उपनिरीक्षक उषा घाटे या पहाडसिंगपुऱ्यात राहतात. त्यांच्याकडे ६ वर्षांचा लेब्रा जातीचा बुझू नावाचा कुत्रा होता. गुरूवारी सकाळी बुझू नेहमीप्रमाणे घरासमोर मैदानावर खेळला. त्यानंतर तो घरी स्वत:हून परतला. घाटे या त्यानंतर बाहेर फिरायला गेल्या. परंतू ९ वाजता घरी परतल्यावर मात्र बुझू उलट्या करताना आढळला. त्यांनी तत्काळ त्याला खडकेश्वर येथील पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बुझू सह परिसरातील जवळपास ९ भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची बाबनंतर उघड झाली. यात चार मोठे कुत्रे व चार लहान पिल्लांचा समावेश आहे. अज्ञाताने जाणिवपूर्वक ब्रेड, बिस्किटावर विष लावून त्यांची हत्या केल्याची बाब निष्पन्न झाली. बेगमपुरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.