औरंगाबाद : आचारसंहिता लागताच शिवसेनेने आज विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आगामी निवडणुकीत दुहीची बीजे पेरली जातील, एकाच ताटात जेवा, वेगळ्या चुली मांडू नका, असा सूर आज पूर्व, पश्चिम, मध्य मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आळविण्यात आला. सर्वांनी एकदिलाने लढावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. जगत्गुरू संत तुकाराम सिडको नाट्यगृहात शिवसेनेचा मेळावा पार पडला.यावेळी खा. चंद्रकांत खैरे, पक्षाचे सचिव आदेश बांदेकर, अभिनेते शरद पोंक्षे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, प्रा. नितीन बानगुडे, महापौर कला ओझा, लता दलाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, शहरप्रमुख राजू वैद्य, सभापती विजय वाघचौरे यांची उपस्थिती होती. अभिनेते पोंक्षे म्हणाले की, शिवसेनेत कुणी पदे भोगायला आले असेल, तर त्यांनी आताच इतर पक्षांत जावे. सचिव बांदेकर म्हणाले की, यावेळी ठाकरे कुटुंबियांना देण्याची वेळ आली आहे, आजवर त्यांनी महाराष्ट्राला खूप काही दिले आहे. प्रा. बानगुडे यांनी शिवकालीन इतिहासाचे दाखले देत विद्यमान सरकारवर टीका केली.काळ निवडणुकीचा आहे, उघड्यावर आपल्याला धोका नाही. मात्र, वेगळ्या चुली मांडू नका. खा. खैरे म्हणाले की, फक्त धनुष्यबाण पाहून मतदान करा. आपले मत पक्षप्रमुख ठाकरेंना गेले पाहिजे. पूर्व, मध्य मतदारसंघात शिवसेनेला लोकसभेत कमी मते मिळाली. पश्चिममध्ये आघाडी मिळाली असली तरी तेथेही काम करावे लागेल. सर्वांनी पाय जमिनीवर ठेवावेत. अति आत्मविश्वासात कुणीही वागू नये. जिल्हाप्रमुख दानवे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारवर टीका केली. मनसेचे नाव घेण्यावरून वादराजेंद्र आदमाने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. सूत्रसंचालन करताना जिल्हा उपप्रमुख बंडू ओक हे वारंवार मनसेच्या प्रवेशाप्रकरणी बोलत होते. त्यामुळे संतापून खा. खैरे यांनी त्यांना मनसेपुराण बंद करण्याची तंबी दिली.‘भगवा’ महानाट्याला गर्दी मेळाव्यानिमित्त डॉ. अमोल कोल्हे यांचे ‘भगवा’ हे महानाट्य आयोजित करण्यात आले होते. ते महानाट्य पाहण्यासाठी नाट्यगृह खचाखच भरले होते. नाट्यगृहातील गर्दी पाहून अभिनेते पोंक्षे, बांदेकर यांना भाषण करण्याचा मोह आवरला नाही. मात्र, आलेली गर्दी डॉ. कोल्हे यांच्या ‘भगवा’ या महानाट्यासाठी आणि प्रा. बानगुडे यांचे शिवकालीन भाषण ऐकण्यासाठी उत्सुक होती. त्यामुळे गर्दीतून होणारी चुळबूळ भाषण करणाऱ्यांचे लक्ष विचलित करीत होती.
शिवसेनेने फुंकले निवडणुकीचे रणशिंग
By admin | Updated: September 13, 2014 00:35 IST