सिल्लोड : नोकरीचे आमिष दाखवून लोकांना कोट्यवधी रुपयांना गंडविणाऱ्या सिल्लोड येथील शिवाजी डापके, फारुख पठाण यांना सिल्लोड शहर पोलिसांनी मोबाईल नंबर ट्रेस करून मुंबई येथून सोमवारी अटक केली. या दोघांना सिल्लोड न्यायालयात हजर केले असता २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्या.एस.के खान यांनी दिले आहेत. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.एस. बिर्ला यांनी सांगितले की, सिल्लोड तालुक्यातील बऱ्याच लोकांना नोकऱ्यांचे आमिष दाखवून फसविणारे एक मोठे रॅकेट आहे. या रॅकेटचे हे दोन मोहरे आहेत. २८ आॅगस्ट रोजी प्रभाकर केशवराव डापके यांनी तक्रार दिल्यावरून या दोघांना अटक करण्यात आली. आमच्याकडे आतापर्यंत ७ ते ८ लोकांनी तक्रार केली आहे. जवळपास ८० ते ९० लाख रुपये घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तालुक्यात जवळपास १०० वर लोकांकडून १७ ते १८ करोड रुपये या रॅकेटमधील बऱ्याच लोकांनी उकळल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नांदेडकर, पोलीस निरीक्षक एस.एस. बिर्ला , स.पो.नि. वानखेडे, सहायक फौजदार सरोदे व विशेष पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
शिवाजी डापके, फारुक पठाण अखेर अटकेत
By admin | Updated: September 24, 2014 01:04 IST