औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात आता फोडाफ ोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांची सिल्लोडला जाऊन भेट घेऊन भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, तर याला प्रत्युत्तर म्हणून दोन्ही जिल्ह्यांतील भाजप मतदारांनी बुधवारी गुप्त ठिकाणी बैठक घेऊन औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँग्रेससोबतची युती तातडीने तोडावी, यासाठी आग्रह धरला. दरम्यान, भाजपने दगा फटका केल्यास काँग्रेसमधील काही मते फोडण्यासाठी तसेच आ. सत्तारांच्या गटातील मतेही मिळावीत, यासाठी शिवसेनेने रणनीती आखल्याचे उमेदवार दानवे आणि आ. सत्तार यांच्या भेटीतून दिसते आहे.दोन वर्षांपूर्वी झालेल्या जि. प. निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक गट सदस्य निवडून आलेले असतानाही केवळ तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि भाजप-शिवसेनेत राज्यपातळीवर पेटलेला राजकीय संघर्ष समोर ठेवून शिवसेनेने काँग्रेससोबत युती करीत भाजपला जि.प.मध्ये सत्तेत येण्यापासून रोखले. अध्यक्षपद शिवसेनेकडे आले, तर उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले. या सगळ्या राजकीय व्यूहरचनेत महायुतीचे उमेदवार दानवे आणि आ. सत्तार हे आघाडीवर होते. त्याचा राग भाजप सदस्यांच्या मनात कायम आहे. त्याचे पडसाद ४ आॅगस्ट रोजी चिकलठाण्यातील भाग्यश्री लॉनमध्ये झालेल्या एका बैठकीत उमटले. महापौर नंदकुमार घोडेले हे उमेदवार दानवे यांच्यासाठी मतदान मागण्यासाठी गेले, त्यावेळी भाजप सदस्यांनी त्यांना भाषण करू दिले नाही. आधी जि.प.मधील काँग्रेससोबतची युती तोडा, त्यानंतर भाजपचे मतदान मागण्यासाठी या, अशी आक्रमक भूमिका घेत सदस्यांनी महापौरांना बोलण्यास विरोध केला.भाजप मतदारांत संतापशिवसेनेच्या ‘डबलगेम’मुळे भाजपचे मतदार संतापले आहेत. एकीकडे जि.प.मध्ये सत्ता सोडायची नाही आणि दुसरीकडे भाजपच्या मतांची अपेक्षा ठेवायची, यावरून भाजपच्या मतदारांनी बुधवारी एका गुप्त ठिकाणी बैठक घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या बैठकीबाबत भाजपने कमालीचे मौन बाळगले असून, त्याची माहिती बाहेर येऊ दिलेली नाही. जिल्हा परिषदेतून सेनेने तातडीने बाहेर पडावे आणि भाजपला सहकार्य करावे, अशी भूमिका सध्या तरी भाजपची आहे. या सगळ्या राजकारणाचा काय परिणाम होणार, हे २२ आॅगस्ट रोजी मतमोजणीअंती स्पष्ट होईल.
शिवसेना सत्तारांच्या भेटीला; भाजप मतदारांची गुप्त बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:58 IST
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात आता फोडाफ ोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांची सिल्लोडला जाऊन भेट घेऊन भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, तर याला प्रत्युत्तर म्हणून दोन्ही जिल्ह्यांतील भाजप मतदारांनी बुधवारी गुप्त ठिकाणी बैठक घेऊन औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँग्रेससोबतची युती तातडीने तोडावी, यासाठी आग्रह धरला.
शिवसेना सत्तारांच्या भेटीला; भाजप मतदारांची गुप्त बैठक
ठळक मुद्दे फोडाफोडीस सुरुवात : जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँगे्रससोबतची युती तोडण्याची मागणी