तुळजापूर : येथील नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब विश्वनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. माजी उपाध्यक्ष अजित परमेश्वर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नूतन उपाध्यक्ष निवडीसाठी सोमवारी विशेष सभा बोलाविण्यात आली. तहसीलदार काशीनाथ पाटील यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. निवड प्रक्रिया सकाळी साडेअकरा वाजता सुरू झाली. यावेळी बाळासाहेब शिंदे यांनी तीन अर्ज दाखल केले. छाननीत हे तिन्ही अर्ज वैध ठरले. बाळासाहेब शिंदे यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही अर्ज न आल्याने पीठासीन अधिकारी पाटील यांनी शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी न. प. बाहेर उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून तसेच कुंकवाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. सभागृहात नगराध्यक्षा अॅड. मंजुषा मगर यांनी नूतन उपाध्यक्ष शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी गटनेते नारायण गवळी, माजी उपाध्यक्ष अजित परमेश्वर, नगरसेवक पंडितराव जगदाळे, दयानंद हिबारे आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते. सहाय्यक पीठासीन अधिकारी म्हणून महादेव सोनार यांनी काम पाहिले. यावेळी विशाल रोचकरी, कुलदिप मगर, विनोद गंगणे, सुनील रोचकरी, अविनाश गंगणे, राजा भोसले, किशोर साठे, प्रकाश मगर, दिलीप गंगणे, सचिन रोचकरी यांच्यासह कर्मचारी वैभव पाठक, अमर हंगरगेकर आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
तुळजापूर पालिकेच्या उपाध्यक्षपदी शिंदे बिनविरोध
By admin | Updated: May 16, 2016 23:51 IST