सिल्लोड : रांगोळ्याच्या आकर्षक पायघड्या, पारंपरिक वेशभूषेतील महिला आणि पुरुषांनी सादर केलेली लेझीमची प्रात्यक्षिके, वारकऱ्यांची संस्कृती जोपासणाऱ्या टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय झेप मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीने रविवारी शहरवासीयांचे लक्ष्य वेधले. लेखिका ए.बी. साळवे यांच्या हस्ते या दिंडीला प्रारंभ झाला. ‘भारतीय राज्यघटना, अखेरचा सम्राट, तहहयात परिवर्तन आणि प्रबोधन, माझी जन्मठेप, तुकारामाची गाथा, धर्मयुद्ध क्रांतिचंद्र, श्रीमान योगी आणि छावा हे ग्रंथ पालखीत ठेवण्यात आले होते. रामकृष्ण महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुरू झालेल्या या ग्रंथदिंडीचा समारोप संमेलनस्थळी झाला. स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. एम.डी. कड पाटील आणि संमेलनाचे आयोजक समीक्षक डी.एन. जाधव यावेळी उपस्थित होते. पहिल्या झेप साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शिवाजी वाठोरे, लीलादेवी अग्रवाल वाचनालयाचे अध्यक्ष सीताराम अग्रवाल, काव्यसरी मंडळाचे अध्यक्ष विजय शिर्के, प्राचार्य ज्ञानेश्वर गोराडे, कवी दौलत भारती, कवी धनंजय गव्हाळे आदी मान्यवर मंडळी ग्रंथदिंडीत सहभागी झाली होती. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पवार, माऊली वारकरी शिक्षण संस्था, रामकृष्ण महाविद्यालय आणि इतर महाविद्यालयांचे विद्यार्थीही उत्साहाने सहभागी झाले होते. ‘वाचनाचा जिथे छंद, तिथे ज्ञानाचा सुगंध’, ‘इथे सिल्लोड नगरी साहित्याचा जयघोष करी’ यासारख्या सुंदर घोषणांचे फलक हाती घेऊन विद्यार्थी जनजागृती करीत होते. वारकरी मंडळी या ‘पालखीचे भोई झाले होते.’ रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी ग्रंथदिंडीचे स्वागत केले. ‘एक,दोन,तीन,चार... मराठीचा जयजयकार ’असा दिंडीतील विद्यार्थ्यांचा जयघोष सुरू असल्याने अवघे वातावरणच साहित्यमय होऊन गेले होते. ग्रंथदिंडी संमेलन स्थळापाशी आल्यावर वारकरी मुलांनी ग्रंथदिंडी वाहिली, तसेच मराठी गं्रथ संग्रहालयाजवळ महात्मा फुले ग्रंथनगरी येथील ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी नारायण फाळके यांच्या हस्ते झाले. अॅड. संतोष झाल्टे, प्राचार्य नामदेव चापे, राधेश्याम गुप्ता यावेळी उपस्थित होते. ग्रंथदिंडीचे संचालन कवी पवन ठाकूर यांनी केले. सिल्लोड : झेप राज्यस्तरीय संमेलनासारखी आज महाराष्ट्रभर दरवर्षी लहान-मोठी सुमारे दीडशेच्या वर साहित्य संमेलने होतात. या संमेलनातून अभिव्यक्त होणारे विचार आणि मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पुरस्कार योजना तरुण पिढीसाठी एक ऊर्जास्थान आहे, असे प्रतिपादन मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगता समारंभात केले. झेप प्रकाशनतर्फे रविवारी विद्रोही कवयित्री प्रा.डॉ. प्रतिभा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवशीय साहित्य संमेलन घेण्यात आले. प्राचार्य नामदेव चापे यांनी दीपप्रज्वलित करून संमेलनाचे उद्घाटन केले. आयोजक, समीक्षक डी.एन. जाधव यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष डॉ. एम.डी. कड पाटील, लेखिका ए.बी. साळवे, गटशिक्षणाधिकारी नारायण फाळके, प्रा. शिवाजी वाठोरे, मनोज सांगळे, सीताराम अग्रवाल, राधेश्याम गुप्ता आदी होते.
सिल्लोड येथे ‘झेप’ राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची सांगता
By admin | Updated: December 28, 2015 23:50 IST