जालना : जिल्ह्यातील ९९१ पाणीपुरवठा योजनांपैकी साडेपाचशे पेक्षा अधिक योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे या गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बिल भरल्याशिवाय पुरवठा सुरू करणार नसल्याचा पवित्रा महावितरणने घेतल्याने खळबळ उडाली आहे. अनेक गावांत उन्हामुळे पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. त्यातच आठवडाभरापासून महावितरण कंपनीने थकित बिलापोटी पुरवठा खंडित करण्याचा सपाटाला लावला आहे. त्यामुळे आहे ते पाणी मिळणेही बंद झाल्याने संकटात भर पडली आहे. महावितरणच्या आकडेवारीनुसार जालना विभाग एक अंतर्गत बदनापूर शहर व ग्रामीण भाग मिळून १११, भोकरदन १९४, जाफराबाद १४०, जालना शहर १२, जालना ग्रामीण १९६ मिळून ६५४ पाणीपुरवठा योजना आहेत तर विभाग दोन मध्ये अंबड ९३, घनसावंगी ८१, मंठा ९५, परतूर ७७ मिळून ३४९ योजना आहेत. या योजनांकडे १९ कोटी चाळीस लाख रूपयांची थकबाकी आहे. बहुतांश योजनांची वीज देयके नियमित भरली जात नसल्याने ही आकडेवारी वाढत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. विभाग एकमध्ये ११ कोटी ८० लाखांखी थकबाकी आहे तर विभाग दोन मध्ये ७ कोटी ६३ लाखांची थकबाकी आहे. आठवडाभरापासून पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित असल्यामुळे या गावांतील पाणी पुरवठा बंद आहे. टँकरही नसल्याने पायपीट करून महिलांना पाणी आणावे लागत आहे. (प्रतिनिधी)
साडेपाचशे पाणीपुरवठा योजनांचा पुरवठा खंडित
By admin | Updated: March 25, 2017 00:01 IST