वाळूजम नगरातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या रांजणगावात मांस व मच्छी विक्रेते उघड्यावर दुकाने थाटतात. मांस विक्रीच्या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी होत असून, ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. मच्छी व मांस विक्रेते टाकाऊ मांसाचे तुकडे उघड्यावरच टाकत असल्यामुळे परिसर अस्वच्छ होत असून, नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. गावात ठिकठिकाणी असलेल्या मांस विक्रीच्या दुकानांमुळे मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. गावात स्वच्छता राहावी, तसेच मांस व मच्छी विक्रेत्यांना स्वतंत्र मार्केट उभारण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. गावातील एकतानगर व कमळापूर फाट्यावर मांस व मच्छी विक्रेत्यांसाठी भाडे तत्त्वावर जागा घेऊन मार्केट उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सरपंच कांताबाई जाधव यांनी सांगितले.
रांजणगावात मांस विक्रीसाठी स्वतंत्र मार्केट उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:05 IST