औरंगाबाद : धनादेश न वटल्याच्या गुन्ह्यात फिनिक्स इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या संचालिकेला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली ३ महिने कारावास आणि ९ लाख रुपये दंडाची शिक्षा अपिलात रद्द करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. एम.एस. देशपांडे यांनी संचालिकेची निर्दोष मुक्तता केली.
काय होते मूळ प्रकरण
सुनीता मोहन कोरडे २० वर्षांपासून फिनिक्स इंग्लिश स्पीकिंग कोर्स या नावाने अभ्यासक्रम चालवतात. मुकुंद विश्वनाथ जाधव याने इंग्रजी शिकण्यासाठी प्रवेश घेतला होता. तसेच एका प्लॉटच्या व्यवहारात आर्थिक मदत म्हणून जाधव याने कोरडे यांच्याकडून ७ लाख रुपयांचा धनादेश घेतला होता. परंतु, कोरडे यांना जाधवच्या व्यवहाराचा संशय आल्याने त्यांनी धनादेश सुरक्षेसाठी दिलेला असल्याने तो वटवण्यासाठी बँकेत टाकू नये, अशी कायदेशीर नोटीस जाधव याला दिली होती. तरीही जाधव याने धनादेश वटवण्यासाठी टाकला. तो न वटल्यामुळे त्याने सुनीता कोरडे यांच्याविरुध्द धनादेश न वटल्याबाबत खटला दाखल केला होता.
खटल्याच्या सुनावणीअंती प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनीता कोरडे यांना ३ महिने कारावास आणि ९ लाख रुपये दंड ठोठावला होता. कोरडे यांनी या निकालाविरुध्द ॲड. विकास देशमुख यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. ॲड. देशमुख यांना ॲड. चेतन जाधव यांनी सहकार्य केले.
चौकट
केवळ सुरक्षेसाठी धनादेश दिल्याचा बचाव
ॲड. देशमुख यांनी अपीलात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, कनिष्ठ न्यायालयात सुनीता कोरडे यांना बचावाची पुरेशी संधी मिळालेली नाही. धनादेश केवळ सुरक्षेसाठी दिलेला होता, कसलाही आर्थिक व्यवहार झालेला नाही. त्याबाबतचे पुरावेही त्यांनी न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने कोरडे यांची शिक्षा रद्द करून त्यांची निर्दोष मुक्तता केली.