छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सरचिटणीस तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक मधुकरअण्णा हरिभाऊ मुळे (रा. बन्सीलालनगर) यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धपकाळामुळे मंगळवारी (दि.१८) दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बनेवाडी येथील स्मशानभुमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
व्यावसायाच्या निमित्ताने मधुकरअण्णा मुळे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. त्यांनी शहरात आल्यानंतर १९५६ साली 'शालेय साहित्य मंदिर' या नावाने पुस्तके व स्टेशनरीचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर १९५८ साली स्थापन झालेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य बनले. १९६२ साली सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अजीव सभासद बनत केंद्रीय कार्यकारणीवरही कार्य केले. त्याचवेळी त्यांनी 'मुळे बदर्स' या कंपनीची स्थापना करीत तिन्ही बंधुंच्या मदतीने कालवे, धरणे आणि इमारत बांधकाम व्यवसायात प्रवेश करीत देशभरात वेगवेगळे प्रकल्प पूर्ण केले.
१९८८ साली त्यांची मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. त्यानंतर तब्बल २५ वर्षे त्यांनी याच पदावरून 'मशिप्रमं'चा विस्तार मराठवाडाभर केला. त्यात ११ महाविद्यालये, ३० कनिष्ठ व उच्च माध्यमिक विद्यालये, २ विधी महाविद्यालये,१ फार्मसी, ५१ माध्यमिक विद्यालये, ३ प्राथमिक शाळा, २ कायम विनाअनुदानित महाविद्यालये अशा १०० पेक्षा अधिक शाखांपर्यंत विस्तार केला. शिक्षणक्षेत्रात कार्य करीत असतानाच बांधकाम, बी-बियाणे, साखर उद्योग, वाहन विक्री अशा विविध क्षेत्रात उद्योगाचा विस्तार केला होता. त्याचवेळी ७७ व्या अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात करून स्वागताध्यक्षपद भुषविले. तसेच मराठवाडा साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. मसापच्या विकासामध्ये मधुकरअण्णा यांनी मोठे याेगदान दिले आहे.
१९९९ साली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून औरंगाबाद पश्चिम या विधानसभा मतदारसंघातुन निवडणुकही लढले. शिक्षण, उद्योग, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुले उद्योजक सचिन व अजित मुळे, बंधु उद्योजक शरदराव, सुधाकरराव आणि पद्माकरराव मुळे यांच्यासह सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.