गजानन वाखरकर, औंढा देशातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या नागनाथ ज्योर्तिलिंगामुळे औंढा शहराला मोठे महत्त्व आहे. दररोज भाविकांसह प्रवासी व व्हीआयपींची ये-जा सुरू राहत असल्याने पोलीस यंत्रणेला अक्षरश: वेठीस धरले जाते. अशा स्थितीत औंढा ठाण्यात अपुरे बळ असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ७९ गावांचा समावेश व संवेदनशील असलेल्या ठाण्यामध्ये केवळ दोन अधिकारी व ४६ कर्मचारी असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यास दुहेरी काम करावे लागत असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण पडत आहे. ठाणे हद्दीतील ७९ गावांमध्ये सेनगाव तालुक्यातील ९ तर हिंगोली ग्रामीणमधील २ गावांचा यामध्ये समावेश आहे. एक पोलीस निरीक्षक व एक सहाय्यक निरीक्षक यांची येथे नियुक्ती असून, पदोन्नतीने आलेले तात्पुरते अधिकारी येथे कामकाज पाहत आहेत. २०११ ते १२ मध्ये या ठाण्याची कर्मचारी संख्या ६२ एवढी होती. सध्या ही संख्या ४६ वर येऊन ठेपल्याने कामाचा मोठा ताण या कर्मचाऱ्यांवर पडत आहे. औंढा हे तीर्थक्षेत्र असून सुरक्षेच्या यादीत हे ठिकाण मर्मस्थळ म्हणून अव्वल ठिकाणी आहे. अतिसंवदेनशील असणाऱ्या गावात नेहमीच या ना त्या कारणामुळे तणावाच्या घटना घडतात. अगदी राज्य रस्त्यालगत हे गाव असल्याने २४ तास येथे पोलिस बंदोबस्त ठेवावा लागतो. ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात, सिद्धेश्वर तलाव व तालुका कोषागार कार्यालयांत तीन अधिक एक गार्ड तैनात आहेत. यासाठी १२ कर्मचारी तेथेच लागतात. ठाण्यातील दैनंदिन कामकाजास १२ कर्मचारी व चार बीटमध्ये प्रत्येकी २ प्रमाणे ८ कर्मचारी काम करतात. शिवाय वायरलेसला २, न्यायालयात एक, २ चालक असे कर्मचारी नियमीत कामात गुंतलेले आहेत. (समाप्त)
अपुऱ्या बळाअभावी सुरक्षेचा प्रश्न गंभीर
By admin | Updated: December 15, 2015 23:29 IST