लातूर : लोकायत विचारमंच नांदेडच्या वतीने रविवारी, १ जानेवारी रोजी लातुरात दयानंद सभागृहात सकाळी १० वाजता दुसऱ्या विवेक जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेस ज्येष्ठ विचारवंत मेधा पाटकर, आ. ह. साळुंके आणि डॉ. रावसाहेब कसबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीस बळ मिळावे, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक अंगाने महाराष्ट्र आणि देश समृध्द व्हावा, समाजातील विविध स्तरातील व्यक्तींना सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळावी यासाठी या विवेक जागर परिषदेचे लातुरातील दयानंद सभागृहात १ जोनवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सांस्कृतिक दहशतवाद या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, मेधा पाटकर, डॉ. नागनाथ कोतापल्ले, उत्तम कांबळे, शैला दाभोळकर आदींच्या विचारांचा जागर होणार आहे. पहिल्या सत्रात समकालीन शिक्षण, संधी, समानता व गुणवत्ता या विषयासंदर्भाने शिक्षण जाणीव परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, परिषदेचे उद्घाटन डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या हस्ते होणार असून, डॉ. आ. ह. साळुंके यांचे मार्गदर्शन होणार आहे. दिवसभर विविध विषयावर अनेक विख्यात मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
दुसरी विवेक जागर परिषद
By admin | Updated: December 31, 2016 23:37 IST