बीड : आठ नगरसेवकांनी एकाच दिवशी बंडाचे निशाण फडकावल्याने झालेल्या पडझडीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अद्याप सावरलेला नसताना मंगळवारी आणखी काही नगरसेवक व नगरसेवक पतींनी नाराजीला तोंड फोडले. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच येथील पालिकेत पक्षांतर्गत राजकीय गरमागरमी वाढली आहे.माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर टिकेची झोड उठवून नुकतीच वेगळी चूल मांडली. एकाचवेळी आठ नगरसेवक बाजूला झाल्यानंतर निष्ठावान व बंडखोर नगरसेवक अशी उभी फूट पडली आहे. पटेल यांनी केलेले वार परतावून लावण्यासाठी काही नगरसेवकही पुढे सरसावले आहेत.मंगळवारी मात्र, काही नगरसेवक पतींनी निष्ठावंतांना डावलले जात असल्याचा सूर आळवत डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. नगरसेवक विनोद धांडे, अशोक शिराळे व अमर नाईकवाडे, बाळासाहेब गुंजाळ, सुनील महाकुडे यांनी संयुक्त पत्रकातून नाराजीला तोंड फोडले. नगरपालिकेतील सत्ता आ. जयदत्त क्षीरसागर यांच्यामुळेच आल्याचा दावा करुन त्यांनी डॉ. भारतभूषण क्षीरसागरांना कोपरखळी मारली आहे. आ. विनायक मेटे सतत जयदत्त क्षीरसागर यांच्यावर टिकेची झोड उठवतात. मात्र त्यांच्या गटाच्या नगरसेवकांना काम वाटपात प्राधान्य दिले जाते. पक्षातीलच निष्ठावंत नगरसेवकांना मात्र ताटकळत ठेवले जात असल्याचा सूरही या नगरसेवकांनी आळवला आहे. राष्ट्रवादी एकसंघ ठेवण्याची गरज असताना मानणारा, न मानणारा असा भेद नगरसेवकांत करुन न मानणाऱ्यांना वेठीस धरले जात असल्याची खंतही या नगरसेवकांनी व्यक्त केली. त्यामुळे पालिकेतील राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीला दुसरा धक्का; आणखी पाच नगरसेवकांचा नाराजीचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2016 01:09 IST