हिंगोली : जिल्हा दुष्काळसदृशच्या यादीत असला तरी त्याबाबतचा शासन निर्णय येत्या एक-दोन दिवसांत निघण्याची शक्यता आहे. तसे संकेत देत चारा व पाणीटंचाईवरील उपाययोजनांबाबत आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी दिल्या.राज्यातील विविध भागात असलेल्या टंचाईबाबत मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेण्यात आला. त्यात हिंगोली जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी लतिफ पठाण, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर आदींनी दिली. हिंगोली जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता कोणत्या उपाययोजना केल्या म्हणजे हा प्रश्न सोडविता येईल, याचा वास्तवदर्शी अहवाल अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही विविध सूचना दिल्या. चाराटंचाईचा प्रश्न सप्टेंबरअखेरपर्यंत निर्माण होणार नाही, असे कृषी विभागाने सांगितले. मात्र त्यानंतरच्या उपायांबाबत जि.प. सर्कलनिहाय आढावा घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार चारा छावणी वा डेपो याबाबतचे नियोजन करून संस्था, कारखाने आदींनी ते चालविले पाहिजे, यादृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. याशिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यांतही परिस्थिती वेगळी नसल्याने चारा उपलब्धतेचा पर्याय शोधण्यासही सांगण्यात आले. २१ आॅगस्ट रोजी उपायुक्तांकडे बैठकही होणार आहे. (वार्ताहर)
मुख्य सचिवांकडून टंचाईचा आढावा
By admin | Updated: August 20, 2014 00:22 IST