परंडा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तुळजापूर कार्यालयातील पथकाने देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोसह २ लाख १६ हजारांची देशी दारू असा एकूण ५ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास परंडा तालुक्यातील लोहारा शिवारात करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस. आर. राठोड यांनी सांगितले की, परंडा-कुर्डूवाडी रस्त्यावर लोहारा शिवारातून देशी दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती या कार्यालयाला मिळाली होती. यावरून अधीक्षक एस. एन. श्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यमनिरीक्षक संजय राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईत एमएच ०४/ ईवाय ७२२६ या क्रमांकांचा टेम्पो पकडण्यात आला. या टेम्पोमध्ये सुमारे २ लाख १६ हजार रूपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. यावेळी पथकाने संदीप इंद्रजीत लेंडे (वय २५, रा. निमगाव, ता. माढा), महेश विठ्ठल दळवी (वय २४, रा. लोणी, ता. परंडा), शहाजी सतीश मोरे (वय ३१, रा. बावी, ता. माढा), राजेश गोविंद मोरे (वय २९, रा. बावी, ता. माढा) आणि टेम्पोचालक श्रीकृष्णा गोवर्धन सुर्वे (वय ३२, रा. बावी, ता. माढा) या पाच जणांना अटक केली. याप्रकरणी विनोद हजारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे सुधारित अधिनियम २००५ मधील कलम ६५ ए, ई, ८१, ८३ व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दुय्यम निरीक्षक राठोड करीत आहेत. या पथकामध्ये उपनिरीक्षक पी. जी. कदम, उमरगा भरारी पथकाचे जावेद कुरेशी तसेच विनोद हजारे, विशाल चव्हाण, शरद चव्हाण, विजय पवार, व वाहन चालक एजाज शेख यांचा समावेश होता. (वार्ताहर)
सव्वादोन लाखांची देशी दारू जप्त
By admin | Updated: February 6, 2015 00:55 IST