औरंगाबाद : चार दिवसांनंतर शनिवारी पुन्हा शहरात संततधार पाऊस झाला. दुपारपासून रात्री उशिरापर्यंत सर्वत्र पाऊस सुरू होता. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. शहरात रात्रीपर्यंत २९.७ मि. मी. पावसाची नोंद झाली. चालू आठवड्यातच सोमवारी आणि मंगळवारी शहरात दमदार पाऊस झाला होता. मंगळवारी दिवसभर संततधार सुरू राहिल्यामुळे अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्यानंतर दोन दिवस पावसाने उघडीप घेतली. शुक्रवारपासून मात्र, काहीसे ढगाळ वातावरण होते. शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. रेल्वेस्टेशन, हर्सूल, सातारा, देवळाई, चिकलठाणा, सिडको, हडको, जुने शहर, छावणी, भावसिंगपुरा, उस्मानपुरा आदी भागांत पावसाने हजेरी लावली. अधूनमधून किंचित विश्रांती घेऊन रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरू होता. त्यातही सायंकाळी ४ ते ६ या वेळेत पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. जालना रोडवर क्रांतीचौक, दूध डेअरी, हायकोर्ट आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. औरंगपुरा, टीव्ही सेंटर चौक, मध्यवर्ती बसस्थानकाजवळील कार्तिकी हॉटेल, सिडकोतील भगवानबाबा होमिओपॅथिक कॉलेजजवळचा रस्ता, जवाहर कॉलनी, उस्मानपुरा, रेल्वेस्टेशन परिसर, चिकलठाणा, सातारा परिसर या भागातील रस्त्यांनाही तळ्याचे स्वरूप आले होते. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली होती. दरम्यान, पावसामुळे सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट राहिला. चिकलठाणा वेधशाळेतील नोंदीनुसार रात्री ८ वाजेपर्यंत २९.७ मि. मी. पाऊस झाला.
शहरात शनिवारीही संततधार
By admin | Updated: July 10, 2016 01:00 IST