लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शौचालय बांधकामाच्या थंडावलेल्या मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेने आता सरपंच व ग्रामसेवकांवर जबाबदारी टाकली आहे़ शंभर टक्के उद्दिष्टासाठी पुढील काही महिन्यांत सुमारे २ लाख २० हजार शौचालयांचे बांधकाम करावे लागणार असून गाव हागणदारीमुक्त न झाल्यास सरपंच व ग्रामसेवकांना जबाबदार धरण्यात येणार आहे़ प्रत्येक सरपंच व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील उर्वरित शौचालय बांधून जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे़ जिल्ह्याचे उद्दिष्ट ४ लाख ३६ हजार ५१३ असून त्यापैकी २ लाख ११ हजार ४३९ शौचालय पूर्ण झाले आहेत़ २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात येणार असून त्यासाठी तयारी सुरु आहे़ दरम्यान, अर्धापूर व मुदखेडनंतर आता भोकर, उमरी, हदगाव, हिमायतनगर, धर्माबाद ही तालुके शंभर टक्के हागणदारीमुक्तीच्या वाटेवर आहेत़, परंतु उर्वरित तालुक्यांत अजूनही शौचालयांची कामे रखडली आहेत़ त्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांना प्रशासनाने पत्र देऊन गाव हागणदारीमुक्तीची संपूर्ण जबाबदारी सोपविली आहे़ जिल्हा हागणदारीमुक्त करायचा आहे़ मात्र याकडे काही सरपंच व ग्रामसेवकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे़ यापुढे गाव हागणदारीमुक्त न झाल्यास स्वस्त धान्य दुकानातून कोणत्याही प्रकारचे धान्य मिळणार नाही़ वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभही घेता येणार नाही़ तसेच मतदानही करता येणार नाही़, असे नमूद केले आहे़
सरपंच,ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:53 IST