नांदेड : नऊ वर्षानंतर तयार करण्यात आलेला महापालिका कर्मचारी आकृतिबंध शासनाने मंजूर केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली असून आयुक्त सुशील खोडवेकर यांनी पुढील २५ वर्षांचा कालावधी डोळ्यासमोर ठेवून तयार केलेल्या आकृतिबंधात २ हजार ८३५ पदे प्रस्तावित आहेत़ महापालिकेत मंजूर पदे २ हजार ३३८ असून नवनिर्मित पदे ४९७ पदे निर्माण करण्यात आली आहेत़ यासंदर्भात आयुक्त सुशील खोडवेकर यांनी आकृतिबंध मंजूर झाल्याचे पत्र महापालिकेला अद्याप प्राप्त झाले नसल्याचे सांगितले़ परंतु आकृतिबंध शासनाकडून मंजूर झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे़ दरम्यान, परिवहन व पर्यटन विभाग, मागासवर्गीय कक्ष, विभागीय चौकशी कक्ष इत्यादींचा समावेश आकृतिबंधात करण्यात आला आहे़ तर पाणीपुरवठा व मलनि:स्सारण हे स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत़ हा प्रस्ताव क वर्ग महापालिका वसई-विरार महानगरपालिकेचा मंजूर आकृतिबंध आणि सेवाप्रवेश नियमास अनुरूप तयार केला आहे़ आयुक्त खोडवेकर यांनी तब्बल ४९७ नवनिर्मित पदे निर्माण करण्याचा धडाडीचा निर्णय घेतल्यामुळे आगामी काळात प्रशासनाला गती मिळणार आहे़ महापालिकेचा कार्यभार सांभाळण्यासाठी मागील काही वर्षापासून प्रभारी पदे निर्माण करून महापालिकेचा पदभार सांभाळण्यात येत आहे़ अतिरिक्त कामांच्या ओझ्याने वाकलेल्या कर्मचाऱ्यांचे नव्या भरतीकडे लक्ष होते़ २००६ मध्ये महापालिकेने आकृतिबंध सादर केला होता़ त्यावेळी ३८ पदे मंजूर झाले होते़ मनपात उपायुक्त पदे तीन मंजूर होती़ आता दोन नवीन उपायुक्तांची मागणी केली आहे़ त्यामुळे पाच उपायुक्त व दहा सहायक आयुक्त महापालिकेला लाभणार आहेत़ काही नवीन पदे निर्माण केली आहेत़ यामध्ये महापौर, उपमहापौर, सभापती यांच्यासाठी लघूलेखक नवीन पद भरण्यात येत आहे़ कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांच्याही जागा वाढविण्यात आल्या आहेत़ सहायक नगररचना हे पद आता उपसंचालक नगररचना म्हणून निर्माण होत आहे़ नगरसचिवासोबतच उपसचिव व मुख्य विधी अधिकारी हे पदे निर्माण केली आहेत़ शिक्षण विभागात १२२ पदे मंजूर असून नवीन ४२ पदे मागण्यात आले आहेत़ ९ शिक्षण विस्तार अधिकारी व १३ केंद्रप्रमुख निर्माण होत आहेत़ शहरातील सर्व शाळा महापालिकेच्या अधिकारात येणार असल्याने नवीन पदांची निर्मिती करण्यात येत आहे़
आकृतिबंध मंजूर
By admin | Updated: January 15, 2016 23:39 IST