औरंगाबाद : औरंगाबादेत रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्यावर दरवर्षी पहिल्या पावसात कधी खताची, तर कधी सिमेंटची पोती भिजतात. हा प्रकार काही केल्या थांबत नसल्याची स्थिती आहे. मालधक्क्यावर दोन दिवसांपूर्वी रेल्वेने सिमेंटची शेकडो पोती आली होती. शहरात रविवारी सायंकाळी आणि सोमवारी दुपारी पडलेल्या पावसामुळे यातील सिमेंटची अनेक पोती भिजली. भिजल्यामुळे अनेक सिमेंटची पोती अक्षरश: दगडाप्रमाणे झाली होती.
मालधक्क्यावर ही पोती उघड्यावर उतरविण्यात आली होती. रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर एकच धावपळ उडाली. त्यामुळे पोती भिजू नयेत म्हणून ताडपत्री टाकण्यात आली होती, तरीदेखील अनेक पोती भिजली. ही पोती सोमवारी तशीच ट्रकमध्ये लोड करण्यात आली. काही पोती फाटून त्यातील सिमेंट बाहेर पडले होते. जागोजागी भिजलेली सिमेंटची पोती पडून होती. काही पोती भिजून दगडाप्रमाणे झाली होती. सिमेंटची पोती भिजली तरी काही नुकसान होत नसल्याचे माल उतविणाऱ्यांनी सांगितले.
३ वर्षांपूर्वी भिजले होते सिमेंटजून २०१८ मध्येही मालधक्क्यावर सिमेंटची शेकडो पोती पावसात भिजण्याचा प्रकार झाला होता. आता ३ वर्षांनंतर पुन्हा एकदा सिमेंटची पोती भिजली. मालधक्क्यावर शेड आहे; परंतु एकाच वेळी २ ते ३ मालगाड्या आल्यानंतर माल थेट उघड्यावर उतरविला जातो. कारण मालगाडीत माल ठेवल्यास शुल्क लागते. रेल्वे आल्यानंतर ९ तासांच्या आत माल उतरवून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक पोत्यासाठी प्रतितास शुल्क मोजावे लागते. हे शुल्क वाचविण्यासाठी उघड्यावर माल उतरविला जातो.
खताची खबरदारी, थेट ट्रकमध्ये पोतीमालधक्क्यावर खताची मालगाडीही दाखल झाली आहे. पावसाच्या वातावरणामुळे सोमवारी ही पोती मालगाडीतून थेट ट्रकमध्ये उतरविण्यात येत होती. त्यासाठी प्रत्येक मालगाडीच्या वॅगनसमाेर ट्रक उभा करण्यात आला होता.