लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचराकोंडी कायम असताना सातारा-देवळाई नागरी वसाहतीत जमा झालेल्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी साता-यात कचरा कंपोस्टिंग प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सातारा-देवळाईवासीयांनी कचरा व्यवस्थापनात एक पाऊल पुढे टाकले आहे.कच-यामुळे शहराची वाईट अवस्था झाली असून, नागरिकांच्या आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात आपल्या भागात ही परिस्थिती उद्भवू नये व आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सातारा-देवळाई येथील नागरिकांनी एकत्र येऊन कचरा व्यवस्थापनासाठी पुढाकार घेतला आहे. नागरिकांच्या पुढाकाराला महापालिकेचे वॉर्ड अधिकारी मनोहर सुरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सातारा-देवळाईतून जमा होणा-या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी कचºयाचे कंपोस्टिंग करणे सुरू केले आहे.या परिसरातून दररोज जवळपास १६ टन कचरा जमा होतो. यात सुका कचरा ५ टन, तर ओला कचरा ११ टन आहे. हा कचरा पूर्वी नारेगावच्या कचरा डेपोत टाकला जात होता; परंतु येथे कचरा टाकणे बंद झाल्याने येथील नागरिक त्रस्त होते. त्यातून नागरिकांनी कंपोस्टिंग करून कचºयाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. परिसरातील एसआरपी कॅम्प व हिवाळे लॉनच्या पाठीमागे रेल्वेपटरीलगत मोकळ्या जागेत रिक्षाने परिसरातील कचरा आणून टाकला जात आहे. तेथे कचºयाचे ओला व सुका असे वर्गीकरण केले जात आहे.कचरा कंपोस्टिंगसाठी दोन्ही ठिकाणी २ ते ३ गुंठे जागेत ४ बाय ४ चे खड्डे खोदून कुजणारा कचरा खड्ड्यात टाकला जात आहे. तसेच दुर्गंधी येऊ नये म्हणून त्यावर औषधी टाकली जाते, तर प्लास्टिक कचरा सेंट्रल नाका येथे जमा करून कॅनपॅकला दिला जात आहे. जागरूक नागरिक व वॉर्ड अधिकारी यांनी कचरा जिरविण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे सातारा-देवळाई भागातील रहिवाशांची तात्पुरत्या स्वरूपात का होईना कचरा दुर्गंधीपासून सुटका झाली आहे.
साता-यात कचरा कंपोस्टिंग प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:08 IST