छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत आता प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पाेहोचत आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात व्यस्त आहेत. त्यात उमेदवारांचे ‘सारथी’ म्हणजे वाहनचालकही मागे नाहीत. तहानभूक विसरून या काळात साहेबांना ‘साथ’ देत आहेत. साहेबांबरोबर तेही अगदी १४-१४ तास बिझी राहत आहेत.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आता अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर देत आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावात, शहरातील प्रत्येक भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधून मतदानाचे आवाहन केले जात आहे. यासाठी प्रत्येक दिवसाचे नियोजन करण्यात आले आहे. यात कमीतकमी वेळेत जास्तीतजास्त ठिकाणी पोहोचण्यासाठी उमेदवारांचे चालक महत्त्वाची भूमिका निभावत आहेत.
१४-१४ तास प्रवासधनंजय भावले (चंद्रकांत खैरे यांचे चालक) : सकाळी ९ वाजता घराबाहेर पडतात. त्यानंतर थेट रात्री ११ वाजता परत घरी जातात.
राजेंद्र दळवी (संदीपान भुमरे यांचे चालक) : सकाळी ९ वाजता चालक म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी हजर होतात. रात्री ८ वाजेनंतरच घरी परतात.
जेवणासाठीही वेळ नाहीएकदा घराबाहेर पडल्यानंतर चालकांना जेवणासाठीही वेळ मिळत नसल्याची स्थिती आहे. साहेब एखाद्या ठिकाणी थांबल्यानंतर परत येईपर्यंतच्या वेळेत चालकांना चहा, पाणी, नाश्ता उरकून घ्यावा लागत आहे.
हो म्हणायचे बसदिवसभर धावपळ असते. चहा, पाणी, नाश्ता घेतो. झोप येऊ नये, यासाठी शक्यतो जेवण टाळतो. साहेब विचारतात काही खाल्लं का? हो म्हणायचे बस. गाडी चालविताना कुणाचेही फोन घेत नाही.- धनंजय भावले, चंद्रकांत खैरे यांचे चालक
३५ वर्षे पूर्ण३५ वर्षांपासून साहेबांची गाडी चालवीत आहे. प्रत्येक निवडणूक मी जवळून पाहिली आहे. सध्याही धावपळीचे दिवस आहेत. सकाळी ९ वाजता घराबाहेर पडतो. सोबत डबा घेतो. शक्य झाले तरच दुपारी घरी जातो.- राजेंद्र दळवी, संदीपान भुमरे यांचे चालक