नांदेड : शहर वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत़ वाहतुकीला शिस्त असावी यासाठी मनपाने शहरातील प्रत्येक रस्त्यावर सिग्नल बसविले आहेत़ परंतु अनेक वाहनधारक सिग्नलकडेही दुर्लक्ष करतात़ अशा वाहनधारकांवर मात्र आता या ठिकाणी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असून नियम तोडल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे़महापालिकेच्या वतीने शहरात १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सिग्लवरही हे कॅमेरे लावण्यात आले आहेत़ कॅमेऱ्याच्या ठिकाणीच ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहे़ तसेच या सर्वांचे नियंत्रण करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे़ या ठिकाणी शहरातील प्रत्येक रस्त्यावरील हालचाल कॅमेऱ्याद्वारे अचूक टिपण्यात येत आहे़ त्यामुळे काही अट्टल गुन्हेगारही नुकतेच पोलिसांच्या हाती लागले आहेत़ या कॅमेऱ्याद्वारे वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात येणार आहे़ एखाद्या वाहनधारकाने सिग्नल तोडल्यास ध्वनिक्षेपकाद्वारे दुसऱ्या सिग्नलवरील वाहतूक कर्मचाऱ्याला संबंधित वाहनाचा क्रमांक सांगून दंड फाडण्याच्या सूचना करण्यात येत आहेत़ गेल्या दोन दिवसांत अशाप्रकारे तब्बल ५० वाहनधारकांकडून दंडाची वसुली करण्यात आली आहे़ तसेच सिग्नलच्या ठिकाणी वाहनधारक नियमाचे उल्लंघन करीत असल्यास त्वरित ध्वनिक्षेपकाद्वारे त्याला तंबी देण्यात येत आहे़ या कॅमेऱ्याच्या नियंत्रणासाठी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून नियम तोडल्यास त्या वाहनाचे, वाहनधारकाचे पूर्ण छायाचित्र, वाहनाचा क्रमांक आदी माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयातील कक्षाला मिळणार आहे़ वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक विजय कबाडे म्हणाले़ (प्रतिनिधी)
नियम तोडणारे आता कॅमेऱ्याच्या नजरेत
By admin | Updated: July 19, 2014 00:45 IST