सेनगाव : तालुक्यातील बन, वझर खु. या संयुक्त रेतीघाटावर शासनाच्या वाळूउपसा धोरणातील नियमांचा बोजवारा उडवला जात आहे. जेसीबी अन् पंपाचा वापर करीत बेसुमार पद्धतीने वाळू उपसा केला जात असून भिंगी मातीचीही तस्करी केली जात असताना महसूल प्रशासन मात्र याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. परभणी जिल्ह्यातील वझर बु. एक, वझर बु. दोन (ता. जिंतूर) तर तालुक्यातील बन व वझर खु. असे पूर्णा नदीत चार रेतीघाट आहेत. हे चारही घाट परभणी येथील एका एजन्सीने ५७ लाख ४७ हजार ६०० रुपये किमतीत ३० सप्टेंबरपर्यंत ठेक्याने देण्यात आले आहेत. सदर वाळू घाटावर शासनाने सुधारित शासन निर्णयानुसार वाळू उपसा करण्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु या नियमाचा तालुक्यातील बन, वझर खु. या दोन संयुक्त रेती घाटावर बोजवारा उडाला असताना नियंत्रण ठेवणारे सेनगाव तहसील कार्यालय बेफिकीर आहे. या दोन वाळू घाटांवर वाळूबरोबर भिंगी मातीचे उत्खनन केले जात आहे. नदी काठावरील भिंगी मातीचा शेकडो ब्रास साठा या परिसरात राजरोसपणे पहावयास मिळत आहे. या शिवाय वाळूचा जेसीबी व पंपाचा वापर करीत बेसुमार पद्धतीने उपसा केला जात आहे. नियमानुसार नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी जेसीबी, सक्शन पंपाचा वापर करता येत नसून एक मीटर खोलीपर्यंतच वाळू उपसा करणे बंधनकारक आहे. असे असताना या दोन्ही घाटांवर वाळू, भिंगी, रेतीचा जेसीबी, पंपाच्या सहाय्याने दोन ते अडीच मीटर खोलीपर्यंत उपसा चालू आहे. शासन नियम उघडपणे मोडीत काढून नदी पोखरण्याचा उद्योग चालू असताना तक्रारी करूनही नियंत्रण ठेवणार्या तहसीलदारांसह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी परिसरातील पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने जैवविविधता धोक्यात आली आहे. वाळू घाटाच्या तपासणी करणार्या संबंधित अधिकार्यांना जेसीबीने वाळू उपसा होत असल्याचे दिसत असतानाही महसूल यंत्रणा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास तयार नाही. यामुळेच वाळू तस्करीत अनेकांचे हात गुंतले असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांतून होत आहे. बन, वझर खु. या दोन्ही रेती घाटावर जेसीबीने वाळू उपसा होत आहे. या ठिकाणी जेसीबीने वाळू उपसा करण्याची परवानगी आहे. किंवा नाही याची माहिती येथील तहसीलदार मेडके यांना सुद्धा नसल्याचे समोर आले आहे. यासंबंधी तहसीलदार मेडके यांच्याशी विचारणा केली असता जेसीबीने वाळू उपसा करण्याची कोणत्याही परवानगीची आपणाला माहिती नसल्याचे सांगितले. (वार्ताहर)परभणी जिल्ह्यातील वझर बु. एक, वझर बु. दोन (ता. जिंतूर) तर तालुक्यातील बन व वझर खु. असे आहेत पूर्णा नदीत चार रेतीघाट. चारही घाट परभणी येथील एका एजन्सीने ५७ लाख ४७ हजार ६०० रुपये किमतीत ३० सप्टेंबरपर्यंत देण्यात आले आहेत ठेक्याने. बन, वझर खु. या दोन संयुक्त रेती घाटावर बोजवारा उडाला असताना नियंत्रण ठेवणारे सेनगाव तहसील कार्यालय आहे बेफिकीर. दोन्ही घाटांवर वाळू, भिंगी, रेतीचा जेसीबी, पंपाच्या सहाय्याने दोन ते अडीच मीटर खोलीपर्यंत उपसा. शासन नियम उघडपणे मोडीत काढून नदी पोखरण्याचा उद्योग चालू असताना तक्रारी करूनही नियंत्रण ठेवणार्या तहसीलदारांसह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी केले दुर्लक्ष. यासंबंधी सेनगाव येथील तहसीलदार मेडके यांच्याशी विचारणा केली असता जेसीबीने वाळू उपसा करण्याची कोणत्याही परवानगीची आपणाला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
नियमांची पायमल्ली करून वाळू उपसा
By admin | Updated: June 5, 2014 00:14 IST