औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात वेळोवेळी अजब कारभार समोर येतात. आता बनावट कागदपत्रे आणि बनावट पत्ता देऊन चक्क आरटीओ कार्यालयास बनविण्याचा प्रताप समोर आला आहे. अशा प्रकारे बनावट दस्तावेज देऊन अहमदाबाद रोड लाईन्स प्रा.लि. ने पाच वाहनांचे (ट्रक) हस्तांतरण करून घेतल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी या पाचही वाहनांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी दिली.२९ डिसेंबर २०१४ रोजी ही वाहने हस्तांतरित झाल्याची नोंद आरटीओ कार्यालयात आहे. ही वाहने नागपूर ग्रामीण परिक्षेत्रात चालत असल्याने २७ जुलै रोजी विनंती अर्जावरून नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयास या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात येथे वाहने न नेता योग्यता प्रमाणपत्र प्राप्त केल्याचे एका तक्रारीवरून उघड झाले. त्यामुळे औरंगाबाद आरटीओ कार्यालयाच्या वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक विनोद चौधरी, तानाजी धुमाळ यांनी सदर वाहनांच्या हस्तांतरणाच्या वेळी दिलेला पत्ता साठेनगर, वाळूज येथे जाऊन चौकशी केली.तेव्हा या ठिकाणी अहमदाबाद रोड लाइन्स प्रा. लि. नावाचे माल बुकिंग कंपनीचे कार्यालयच नसल्याचे समोर आले. यासंदर्भात दिलेली पोस्टामार्फत दिलेली नोटीसही परत आली. त्यामुळे बनावट कागदपत्रे व बनावट पत्ता नमूद करून वाहनांचे हस्तांतरण करून घेतल्याचे समोर आले.
आरटीओ कार्यालयाला ‘बनविले’
By admin | Updated: September 28, 2016 00:50 IST