संजय तिपाले बीडसहा नगरपालिका निवडणुका निर्विघ्न पार पडाव्यात यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. दहा वर्षांपासूनच्या वेगवेगळ्या निवडणुकांत उपद्रवी ठरलेले व राजकीय पक्षांच्या आश्रयाला असलेले आरोपी ‘खाकी’ वर्दीच्या रडारवर आहेत. त्या सर्वांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवायांचा फास आवळणे सुरु आहे. गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांतील आरोपींवरही हद्दपारीची कारवाई अटळ असून निवडणूक काळात त्यांना जिल्ह्यात ‘नो एंट्री’ राहणार आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यात बीड, परळी, अंबाजोगाई, माजलगाव, धारुर, गेवराई येथील पालिकेसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. निवडणूक काळात सामाजिक स्वास्थ्य अबाधित रहावे, याकरता पोलिसांनी सर्वतोपरी उपाययोजना आखल्या आहेत. मागील दहा वर्षांच्या कालावधील पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये १३८ गुन्हे दाखल झालेले आहेत. यातील पाचशेवर आरोपींची सध्या काय स्थिती आहे? याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासन घेत आहे. कलम ११०, १०७ अन्वये त्या सर्वांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाया सुरु आहेत. आतापर्यंत कलम ११० नुसार १३, १०७ प्रमाणे २८५ जणांविरुद्ध कारवाया करण्यात आल्या आहेत.यासोबतच दारु, जुगार, मटका अशा अवैध व्यवसायातील आरोपी, चोऱ्या- घरफोड्यांतील सराईत गुन्हेगार यांच्यावरही करडी नजर आहे. त्यांच्यावरही प्रतिबंधात्मक कारवायांची प्रक्रिया सुरु असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
निवडणुकांमधील उपद्रवी रडारवर !
By admin | Updated: November 9, 2016 01:26 IST