औरंगाबाद: रेल्वेस्थानकावर तीन नराधमांनी नव्हे तर तिच्यासोबत बळजबरीने लग्न लावून स्वतःच्या घरी ठेवणाऱ्या नराधम रिक्षाचालकाने अल्पवयीन परप्रांतीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे पोलीस तपासात समोर आले.
याविषयी वरिष्ठ सूत्राने सांगितले की, ८ जानेवारी रोजी रात्री चिकलठाणा रेल्वेस्थानक येथे बेवारस अवस्थेत आढळलेल्या १६ वर्षीय युवतीने दिलेल्या माहितीनुसार उस्मानपुरा पोलिसांनी अज्ञात तीन आरोपींवर सामूहिक अत्याचार केल्याचा गुन्हा नोंदविला. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे छायाचित्रण तपासले असता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आक्षेपार्ह काहीही आढळून आले नाही. यानंतर पोलिसांनी डॉक्टरांसमोर तिच्याकडे या घटनेविषयी पुन्हा विचारपूस केली असता तिने तिघांनी अत्याचार केल्याचे आपण घाबरून सांगितल्याचे नमूद केले. मदतीच्या बहाण्याने अनोळखी रिक्षाचालकाने तिला त्यांच्या घरी नेले. यानंतर त्याने तिच्या मनाविरुद्ध मंदिरात नेऊन लग्न केले. यानंतर त्याने स्वतःच्या घरात तिच्यावर बळजबरीने अनेकदा अत्याचार केल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. तिचा नव्याने जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. या घटनेनंतर पोलिसांनी अत्याचारी रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. आरोपीचे घर कोणत्या कॉलनीत आहे हे मात्र पीडितेला सांगता आले नाही . मात्र त्याच्या घराचे वर्णन आणि त्याचे आई वडील त्याच्या घरी असतात असे सांगितले.