बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या तपासासाठी नियुक्त केलेल्या ‘एसआयटी’चा (विशेष तपास पथक) ३१ मार्च रोजी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील हे आढावा घेणार आहेत. २०१२-१३ मध्ये जिल्हा बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा पुढे आला होता. या घोटाळ्यात बँकेचे आजी- माजी संचालक व पदाधिकारी तसेच अधिकारीही अडकले होते. वेगवेगळ्या ठाण्यांत सुमारे १३१ गुन्हे नोंद आहेत. हा घोटाळा संपूर्ण राज्यात गाजला होता. बँकेवर प्रशासक नियुक्तीची वेळ आली होती. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी केलेल्या तपासावर आक्षेप आले होते. सहा महिन्यांपूर्वी संपूर्ण तपास ‘एसआयटी’कडे (विशेष तपास पथक) सोपविला होता. माजलगावचे सहायक पोलीस अधीक्षक डॉ. एन हरी बालाजी व उपअधीक्षक नीलेश मोरे हे प्रमुख असून २१ अधिकाऱ्यांचा पथकात समावेश आहे. आतापर्यंत १२४ गुन्ह्यांचा तपास पथकाने पूर्ण केला आहे. उर्वरित सात प्रकरणांचा तपास अपूर्ण आहे. तपासावर स्वत: अधीक्षक अनिल पारसकर नियंत्रण ठेवून आहेत. ३१ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत आढावा होत आहे. याला नांगरे पाटील यांनी दुजोरा दिला. (प्रतिनिधी)
डीसीसी गुन्ह्यांचा ३१ रोजी आढावा
By admin | Updated: March 28, 2016 00:18 IST