वाळूज महानगर : वाळूज येथे क्लस्टरमधून सुरू असलेल्या विविध विकासकामांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी नुकताच आढावा घेतला. याप्रसंगी डॉ. गोंदावले यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काही सूचना केल्या.
शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात विविध नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाकडून क्लस्टरची योजना राबविण्यात येत आहे. या क्लस्टरमध्ये वाळूज, जोगेश्वरी, कासोडा, आदी गावांचा समावेश आहे. क्लस्टर निधीमधून ड्रेनेजलाईन, व्यायामशाळा, बस थांबे, रस्ते, आदी विकासकामे प्रस्तावित आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, गटविकास अधिकारी विजय परदेशी, कार्यकारी अभियंता काझी, आदींच्या पथकाने वाळूज-रामराई-कासोडा या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी सरपंच सईदाबी पठाण, जि. प. सदस्य रामदास परोडकर, उपसरपंच योगेश आरगडे, ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे यांच्यासोबत डॉ. गोंदावले यांनी चर्चा केली. वाळूजच्या आठवडी बाजारतळातील अतिक्रमण, वाळूजच्या गट नंबर ३६१ मधील शासकीय जागेत अभ्यासिका कक्ष व प्रशिक्षण केंद्रासाठी जागेचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, फिरोज ऊर्फ बबलू पठाण, राहुल भालेराव, नदीम झुंबरवाला, काकासाहेब चापे, अमजद पठाण, शेख ईस्माईल, रोहित परोडकर, तौफिक शेख, फैय्याज कुरैशी, पोपट बनकर, आदींची उपस्थिती होती.