छत्रपती संभाजीनगर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पीए असल्याचे सांगून एका शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात शेतकऱ्याच्या तक्रारीवरून अनोळखी मोबाइलधारकाच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादी जगन्नाथ जयाजी शेळके (रा. न्यू हनुमाननगर, दुर्गामाता चौक, गारखेडा परिसर) यांच्या तक्रारीनुसार त्यांची पळशी गावात शेती आहे. त्या शेतातील रस्त्याचे प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील तहसील कार्यालयात सुरू आहे.
सोशल मीडियावर स्वत:चा संपर्क क्रमांक दिलाशेळके हे सोशल मीडियावर महसूलमंत्री बावनकुळे यांना फॉलो करतात. त्यानुसार त्यांनी त्या अकाउंटवर जाऊन ‘साहेब नमस्कार. मी शेतकरी असून, माझे उपजीविकेचे साधन शेती आहे. शेतीच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवून माझी वडिलोपार्जित शेती पडीक पाडली आहे. जून २०२५ मध्ये शेतात कोणतेही पीक घेता आलेले नाही. मला न्याय मिळेल का? ’असा मेसेज लिहून त्याखाली मोबाइल नंबर दिला.
पैशांची मागणीत्यानंतर १४ ऑगस्ट रोजी तक्रारदार शेळके यांच्या मोबाइलवर एका अनोळखी व्यक्तीने ८५९१९२३०२२ या नंबरवरून फोन केला. त्याने, तुमचे तहसील कार्यालयातील प्रकरण मिटले का? असा प्रश्न विचारत, मी चंद्रशेखर बावनकुळे यांचा पीए निकम मुंबईतून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे प्रकरण निकाली काढण्यासाठी तहसीलदारांना सांगतो, त्यासाठी पोलिस संरक्षण लागेल. हे संरक्षण घेण्यासाठी ४ हजार रुपयांची पावती फाडावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर त्याच नंबरवरून व्हाॅट्सअॅपला स्कॅनर पाठविले. त्यावर शेतकरी शेळके यांनी दोन वेळा एकूण ३ हजार रुपये पाठविले. त्यानंतर १६ ऑगस्ट राेजी पुन्हा त्याच नंबरवरून फोन आला. त्याने रस्त्यावर मुरूम टाकावा लागणार आहे. त्यासाठी ४ हजार रुपये पुन्हा पाठविण्यास सांगितले.
दुसऱ्यांदा पैशाची मागणी केल्याने पोलिसांत धावदुसऱ्यांदा पैसे मागितल्याने फिर्यादीस मंत्री बावनकुळे यांच्या नावाने आपली फसवणूक झाल्याचे वाटल्यामुळे त्यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत मोबाइलधारकाच्या विरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक अशाेक भंडारे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.