नांदेड : जिल्हा पोलिस दलात भरतीचे वेळापत्रक, प्रवेशपत्र किंवा मूळ कागदपत्र नसल्यामुळे अपात्र ठरलेल्या ११० उमेदवारांना सोमवारी पुन्हा संधी देण्यात आली़ १९८५ उमेदवारांपैकी १०८५ जण मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले आहेत़ जिल्हा पोलिस दलाची ६ जूनपासून पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरतीप्रक्रिया सुरु झाली आहे़ ६ व ७ जून रोजी पुरुष उमेदवारांची उंची, छाती व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली़ यावेळी काही उमेदवारांजवळ मूळ कागदपत्र नव्हती़ त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते़ ८ जून रोजी ३२९ महिला उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते़ त्यापैकी जवळपास २२५ महिला उमेदवार उपस्थित होत्या़ यातीलही काही महिला उमेदवारांना प्रवेशपत्र व भरती प्रक्रियेचे वेळापत्रक माहीत नसल्यामुळे भरतीसाठी उपस्थित राहता आले नव्हते़ त्यात अशाप्रकारे अपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला़ त्यांना सोमवारी पहाटे पाच वाजता मुख्यालयाच्या मैदानावर बोलाविण्यात आले होते़ अशा एकूण ११० उमेदवारांना आपले नशीब आजमाविण्यासाठी पुन्हा संधी मिळाली़ त्यात ९४ पुरुष तर १२ महिला उमेदवारांचा समावेश आहे़ यातील अनेक उमेदवार पुढील चाचण्यांसाठी पात्र ठरल्याचे सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले़ ७२ जागांसाठी होणाऱ्या या भरतीप्रक्रियेत १९८५ उमेदवारांनी नोंदणी केली होती़ परंतु पहिल्याच दिवशी भरतीला ३०० हून अधिक उमेदवारांनी दांडी मारली होती़ मैदानी चाचणीसाठी ९०६ पुरुष व १७९ महिला उमेदवार पात्र ठरल्या आहेत़ आता १०, ११ व १२ जून रोजी मैदानी चाचणी होणार आहे़त्यात ५ किमी व १०० मीटर धावणे, गोळाफेक, उंच उडी, पुलअप या चाचण्या होणार आहेत़ मैदानी चाचणीचा निकाल १३ जून रोजी लागणार असून १५ जून रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे़ सर्व भरती प्रक्रियेवर सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे़ (प्रतिनिधी)
भरतीत १०८५ उमेदवार पात्र
By admin | Updated: June 10, 2014 00:16 IST