सिल्लोड : पूर्वीच्या काळी रामप्रहरी गावागावात वासुदेव यायचा. देवाचे नामस्मरण करायचा. आता लवकरच आपल्या भेटीला ‘रावसाहेब रामप्रहरी’ येणार आहे. भाजप सरकारच्या योजनांचे रामप्रहरी सर्वांना स्मरण करून देणार आहे. निवडणुकीत भाजपने ‘घर-घर मोदी’चा फंडा वापरला होता. आता मोदींची जागा रावसाहेबांनी घेतली आहे. नागरिकांना शासनाकडून काय अपेक्षा आहे? लोकांच्या मागण्या काय आहेत? शासन काय करीत आहे? शासनाच्या नेमक्या कोणत्या योजना आहेत, ज्याचा फायदा हा कोणी व कसा घ्यावा? या आणि अशा काही प्रश्नांबाबतची माहिती देण्या-घेण्यासाठी प्रत्येक गावात एक ‘रावसाहेब’ नेमला जाणार आहे. खा. रावसाहेब दानवे यांच्या वाढदिवसापासून ही योजना सुरू करण्यात आल्याची माहिती, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे यांनी सिल्लोड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेत माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, राजेंद्र ठोंबरे, संजय डमाळे, अनिल काळे यावेळी हजर होते़
‘घर-घर मोदी’नंतर आता रावसाहेब रामप्रहरी घरोघरी
By admin | Updated: March 22, 2016 01:30 IST