औरंगाबाद : भाड्याने घेतलेले घर रिकामे करण्यासाठी घर मालकास १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चारजणांविरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शेख अजिम शेख भिकन, शेख मुजीब शेख भिकन (दोघेही रा. हुसेन कॉलनी, गारखेडा), शेख मुसा शेख इब्राहिम आणि शहेजाद, अशी आरोपींची नावे आहेत. शेख अजिम आणि शहेजाद यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. एमआयडीसी सिडको ठाण्याचे फौजदार केदारे यांनी सांगितले की, शेख भिकन या ज्येष्ठ नागरिकाने नारेगावच्या राजेंद्रनगरातील आपल्या घराची हकीम खान यांना विक्री केली होती. २०१४ या वर्षी हकीम खान यांनी फर्निचर व्यावसायिक राजेंद्र पांचाळ (रा.चौधरी कॉलनी, चिकलठाणा) यांना हे घर विकले होते. घराच्या विक्रीनंतरही शेख भिकन आपल्या कुटुंबियांसह भाड्याने तेथे वास्तव्यास होते. पांचाळ यांनी घर खरेदी केल्यानंतरही त्यांनी भाडेकरूम्हणून राहू देण्याची विनंती केली. पांचाळ यांनी ही विनंती मान्य करून भिकन कुटुंबियांना भाड्याने घर दिले.दोन वर्षांनंतर घर रिकामे करण्याचा आग्रह पांचाळ यांनी भिकनला केला. भिकन घर सोडण्यास तयार झाले; परंतु त्यांची मुले शेख अजिम, शेख मुजीब तसेच मुसा इब्राहिम आणि शहेजाद या नातेवाईकांनी घर रिकामे करण्यासाठी पांचाळ यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली तरच घर रिकामे केले जाईल, अशी धमकी त्यांनी दिली. यानंतर पांचाळ यांनी सिडको एमआयडीसी ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शेख अजिम आणि शहेजादला ताब्यात घेण्यात आले.
१० लाखांची मागितली खंडणी
By admin | Updated: November 9, 2016 01:35 IST