लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सोमवारी साजऱ्या होणाऱ्या रमजान ईदनिमित्ताने रविवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी तयारी करण्यात आली़ ईदच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी वाढली होती़ दरवर्षी जिल्ह्यात रमजान ईद उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली जाते़ ठिकठिकाणी असलेल्या ईदगाह मैदानांवर सामूहिक नमाज अदा केली जाते़ सोमवारी जिल्हाभरात ईद साजरी केली जाणार असून, शहरातील जिंतूर रस्ता परिसरातील मुख्य ईदगाहमध्ये सकाळी ९.३० वाजता नमाज अदा केली जाणार आहे. साखला प्लॉट परिसरातील ईदगाहमध्ये सकाळी ८.४५ वाजता तर अमिन कॉलनी येथील ईदगाहमध्ये सकाळी ८.३० वाजता नमाज अदा केली जाणार आहे. तसेच शहरातील अनेक मशिदींमध्ये ८.१५ ते १० च्या दरम्यान नमाज अदा केली जाणार आहे. ईद सणाच्यानिमित्ताने शहरातील बाजारपेठ मागील एक महिन्यापासून सजली आहे़ विविध वस्तू, तसेच कपडे, सौंदर्यप्रसाधनांच्या वस्तू दाखल झाल्या आहेत़ रविवार हा सुटीचा दिवस असल्याने बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती़ कच्छी बाजार, जनता मार्केट, गुजरी बाजार आदी भागात रविवारी दिवसभर गर्दी होती़ ईदच्या दिवशी शिरखुर्म्याचे महत्त्व असल्याने रविवारी शीरखुर्म्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी झाली़ ईदची जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू आहे़
जिल्हाभरात आज साजरी होणार रमजान ईद
By admin | Updated: June 25, 2017 23:23 IST