औरंगाबाद : नवरात्रीची मंगलमय पहाट... आनंद, उत्साह आणि पावित्र्य यांची उधळण करणाऱ्या या वातावरणाला एक झळाळी आली होती ती स्त्री शक्तीचे एक विलक्षण रूप दाखवून देणाऱ्या भव्य बाईक रॅली आणि सायकल रॅलीने. खास नवरात्रीनिमित्त रविवारी ‘लोकमत’च्या वतीने महिलांसाठी भव्य सायकल रॅली आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सहायक पोलीस आयुक्त मीना मकवाना व सामाजिक कार्यकर्त्या पद्मा तापडिया यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. विभागीय क्रीडा संकुल येथून स. ६ वा. रॅली काढण्यात आली. प्रोझोन मॉल येथे रॅलीची सांगता झाली. या रॅलीसाठी महिलांनी दाखविलेला अपूर्व उत्साह वाखाणण्याजोगा होता. भल्या पहाटे नटून थटून रॅलीत सहभागी होणाऱ्या महिलांचे मकवाना यांनी मनापासून कौतुक केले. उपस्थित महिलांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, नवरात्र हा नारीशक्तीचा उत्सव असून आज मोठ्या आत्मविश्वासाने बुलेट आणि बाईक चालवून महिलांनी आपण कोणत्याच क्षेत्रात मागे नसल्याचे दाखवून दिले. ‘लोकमत’च्या वतीने राबविला गेलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. या रॅलीला शालेय विद्यार्थिनींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सगळ्यांनीच भरभरून प्रतिसाद दिला. काव्यांजली बहुरे, सिद्धी सोनटक्के या चिमुकल्यांनी ‘सेव्ह गर्ल चाईल्ड’, ‘पाण्याचा काळजीपूर्वक वापर’ या विषयावर सामाजिक संदेश दिले. सखी मंचच्या अध्यक्षा रेखा राठी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. राधा स्वर्णकार, पुष्पा वाघमारे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. निकिता मांजरमकर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी कमल नयन बजाज हॉस्पिटलचे डॉ. गोविंद ताळवदे, भगवान खाडे, विलास गायकवाड आदींचे सहकार्य लाभले.
रॅलीतून घडले ‘स्त्री’शक्तीचे दर्शन
By admin | Updated: October 10, 2016 01:12 IST