हिंगोली : जिल्हा कार्यकारिणीत संघटनात्मक बदल करण्याबरोबरच दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्तांसाठी पक्ष-संघटनेने काम करण्याचे आवाहन राकॉंच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाध्यक्ष मुनिर पाटील, मावळत्या जिल्हाध्यक्षा रत्नमाला शिंदे, मदन कऱ्हाळे यांची उपस्थिती होती. वाघ यांनी जिल्हाध्यक्षपदी सुमित्रा टाले तर कार्याध्यक्षपदी स. नाजिमा यांच्या नावाची घोषणा केली. त्या म्हणाल्या, मागील काही दिवसांपासून संघटनात्मक बदल केले जात आहेत. शिंदे या आत्महत्याग्रस्तांसाठी काम करणाऱ्या यशस्वीनी अभियानाच्या समन्वयक म्हणून कायम राहतील. सध्या या कामाचे नियोजन सुरू आहे. त्यासाठीच मराठवाड्यात १७ एप्रिलपासून दौरा सुरू असल्याचेही वाघ यांनी सांगितले. आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना थेट मदत नव्हे, तर पायावर उभे करण्याचा प्रयत्न राहील. अशांच्या पाल्यांना विद्या प्रतिष्ठान बारामती येथे शिक्षणाची व्यवस्था करण्याची भूमिका राकॉं नेत्या सुप्रिया सुळे यांनी घेतली. या मुलांचा सर्व खर्च उचलला जाणार आहे. मराठवाडाभर दुष्काळात जनता विशेषत: महिलांची मोठी होरपळ होत आहे. पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. शेतकऱ्यांच्याही वेगळ्या व्यथा आहेत. या सर्व बाबींकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी तृप्ती देसाई यांच्या हाजी अली दर्गाह प्रवेशाबाबत विचारले असता महिलांना संविधानाने बरोबरीचा अधिकार दिला मात्र सामाजिक अधिकार नाकारला जातो आहे. याबाबत न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर निर्णय घेवू, असे सांगितले. तर शनि मंदिर, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणी महिलांना मारहाण झाल्याच्या घटना दुर्दैवी आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याचे त्या म्हणाल्या. (जि.प्र.)
राकॉंची नवी महिला कार्यकारिणी
By admin | Updated: April 25, 2016 23:31 IST