अंबाजोगाई : येथील नगर परिषदेच्या विषय समित्या सोमवारी सकाळी जाहीर झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुमत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाच, तर भाजपची एक अशी समिती जाहीर झाली. या समित्यांमध्ये काँग्रेस पक्षाला कुठलेही स्थान मिळाले नाही. अंबाजोगाई नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीनंतर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सारंग पुजारी यांची राष्ट्रवादीच्या बहुमतामुळे बिनविरोध निवड झाली होती. सोमवारी झालेल्या विषय समित्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली. भाजपला एक, तर काँग्रेस पक्षाला उपसभापतीपद देऊन काँग्रेसची बोळवण करण्यात आली. हा निवडीचा कार्यक्रम बिनविरोध पार पडला.बांधकाम सभापतीपदी शमियोद्दीन काझी (राष्ट्रवादी), पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी विजयमाला गौतम सरवदे (राष्ट्रवादी), शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी राजश्री अशोक मोदी (राष्ट्रवादी), महिला व बालकल्याण समितीच्या सभापतेपदी वासंती मिलिंद बाबजे (राष्ट्रवादी), तर उपसभापतीपदी काँग्रेस पक्षाच्या बबिता महादेव आदमाने, नियोजन समितीच्या सभापतीपदी भाजपाचे विजय जोगदंड यांची निवड झाली.पीठासन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा रचना सुरेश मोदी, उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. सभापतींच्या निवडी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. (वार्ताहर)
राकाँकडे पाच, भाजपकडे एक
By admin | Updated: January 23, 2017 23:36 IST