बीड : जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पाणी आले होते. तर शेतामध्ये जागोजागी पाणी साचले होते. यामुळे भाज्यांची आवक घटली आहे. मात्र भाज्यांचे भाव बुधवारी तरी स्थिर असल्याचे समोर आले. पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाने दडी मारली होती. गणपतीच्या स्थापनेपासून जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली होती. दिवसभर रिपरिप असल्यामुळे शेती कामे पूर्णत: खोळंबली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणेही मुश्कील झाले होते. त्याचा परिणाम भाज्यांच्या आयातीवर झाला आहे. दरम्यान, बुधवारी भाजी मंडईत विक्रेत्यांनी वीस रुपयात सोळा भाज्या दिल्या होत्या. लक्ष्मी जेवण असल्याने सोळा भाज्या एकत्रितपणे भाजी विक्रेत्यांनी दिल्या होत्या. दरम्यान, कोथिंबिरची जुडी १० रुपये, बटाटे २० रुपये, लसून ६० रुपये, कांदा २० रुपये असे भाव बीडच्या भाजीमंडईत बुधवारी होते. मराठवाड्यातूनही आवक घटली जिल्ह्यासह मराठवाड्यात गेल्या दहा दिवसांपासून पाऊस सुरु आहे. बीडच्या बाजारपेठेत बीड तालुका व इतर जिल्ह्यातून भाज्यांचा पुरवठा होतो. इतर जिल्ह्याची परिस्थिती सारखीच असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाज्या विक्रीस उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बीड शहरातील बागवानांना उपलब्ध भाज्याच विक्रीसाठी बाजारात ठेवाव्या लागल्या. (प्रतिनिधी)
पावसामुळे भाज्यांची आवक घटली
By admin | Updated: September 4, 2014 01:26 IST