राजेश गंगमवार, बिलोलीमागच्या पंचवीस वर्षांत देखील इतका कमी पाऊस झाला नव्हता, यावर्षी झाला असून ७ जून ते २० जुलै या दीड महिन्यात केवळ ७० मि़मी़ पाऊस झाला आहे़ दरम्यान, गतवर्षी अवघ्या दीड महिन्यांत ४२० मि़मी़ पाऊस झाला होता़ तालुक्यात दुबार पेरण्यांना प्रारंभ झाला असून शेतकरी हैराण झाला आहे़बिलोली तालुक्याला मांजरा-गोदावरी नदीने वेढलेले आहे़ तालुक्यातील बहुसंख्य गावे नदीकाठी आहेत़ पण मागच्या दीड महिन्यांत अतिशय कमी पाऊस झाल्याने दोन्ही नद्या कोरड्याठाक झाल्या आहेत़ जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली़ प्रारंभी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या़ गतवर्षी प्रमाणेच पाऊस पडेल या आशेवर सर्वच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या़ प्रामुख्याने सोयाबीन व कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली़ जूनच्या दुसऱ्या आठवड्यातील पावसानंतर वरूणराजाने रुसवा काढला तो जुलै उजडला तरी पाऊस झाला नाही़ जुलैच्या महिन्यातील २० दिवसांत १५ मि़मी़ देखील पाऊस नव्हता़ उलट उन्हाळ्याप्रमाणे तापमानाचा पारा वाढला व उगवलेली पिके सुद्धा वाया गेली़ पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला़ पावसाची वाट पाहून पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ शेतकऱ्यांकडे आता पावसाची प्रतीक्षा असून शेती कामेच ठप्प आहेत़ परिणामी मजुरांनाही कामे नाहीत़ गतवर्षी पावसाने प्रारंभीपासूनच वेळेवर हजेरी लावल्याने शेती कामांना वेग होता़ परिणामी सर्वच गावांत शेतीकामे सर्वांकडेच असल्याने शेतमजुरांना चांगलीच मागणी होती़ समूह मजूर शेतीच्या कामांचा ठेका घेत असत़ पण पावसाने डोळे वटारल्याने शेतमजुरांना कामच नाही, अशी परिस्थिती ग्रामीण भागात झाली आहे़तालुक्यातील कुंडलवाडी, रामतीर्थ, आरळी, आदमपूर व सगरोळीसह बिलोली परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ ऐन पावसाळ्याच्या महिन्यातच पाऊस नसल्याने उन्हाळ्याप्रमाणे उकाडा सुरू झाला आहे़ तर मागच्या २५ वर्षात इतका कमी पाऊस झाला नव्हता असे जाणकार वयोवृद्ध सांगत आहेत़ सहा वर्षापूर्वी २००८ मध्ये ९० मि़मी़ पाऊस झाला होता़ तेव्हा देखील अशीच स्थिती होती़ पण लगेच मोठा पाऊस झाला़ त्यात शेतकऱ्यांना संजीवनी मिळाली़ यावर्षीच्या हंगामात अतिशय कमी पाऊस झाल्याने पाणीपातळी खालावली आहे़ मांजरा-गोदावरी दोन्ही नद्या अद्यापही कोरड्याच आहेत़ ७ जून ते २० जुलैपर्यंत मागील दहा वर्षांत झालेला पाऊस२००४-१९८ मि़मी़२००५-३०२ मि़मी़२००६-२१० मि़मी़२००७-१८८ मि़मी़२००८-९० मि़मी़२००९-१६२ मि़मी़२०१०-१७५ मि़मी़२०११-१८२ मि़मी़२०१२-१८८ मि़मी़२०१३-४२० मि़मी़२०१४-७० मि़मी़
२५ वर्षांतील पावसाचा निच्चांक
By admin | Updated: July 21, 2014 00:35 IST