पारडगाव : स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदाच पारडगाव येथील ग्रामपंचायतीत झालेल्या महिलांच्या ग्रामसभेस गावातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आपल्या विविध समस्या ठामपणे मांडल्या.पारडगाव ग्रामपंचायतीने पहिल्यांदाच महिलांची मंगळवारी ग्रामसभा आयोजित केली. त्यास गावातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. विशेषत: ग्रामसभेसमोरील विषयपत्रिकेवरील विषयांवर जोरदार चर्चा केली. जिव्हाळ्याचे प्रश्नही उपस्थित केले. गावातील मुलभूत सोयी-सुविधांचेही प्रश्नही प्राधान्याने मांडले. पिण्याचा पाण्याचा प्रश्न, दलितवस्ती सुधार योजनेची प्रलंबित कामे, गावातील रस्त्याची दूरवस्था, गावात ठिकठिकाणीच्या दिव्यांचा प्रश्न, नाल्याच्या सफाईसह केरकचरा हटविण्याचे काम, दारिद्र्यरेषेखालील व्यक्तिंच्या यादीत गावातील गरीब कुटुंबीयांची नावे समाविष्ट करण्याचा प्रश्न मांडण्यात आला. त्यांना तात्काळ घरकूल मंजूर कराव, महिलांच्या स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी, आणि बचत गटांना रेशम धागा उद्योगात पुढे आणण्यासाठी गटांना मदत करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच चंद्रभूषण जस्वाल ग्रामविकास अधिकारी आर.एम. सपाटे यांनी सर्व महिलांचे म्हणणे ऐकून घेवून त्यावर तात्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले .यावेळी माऊली बचत गटाच्या अध्यक्षा यमुनाबाई ढवळे, गयाबाई बढे,सूर्यवंशी, मिना नांगरे, वंदना सातपूते, द्रोपताबाई चव्हाण, सुनिता कोल्हे, सुशिला कोल्हे, प्रतिभा ढेरे, इंदूबाई खरात, पुष्पा गाडेकर, प्रभा नाटकर, सुशिला सुतार, रेखा डोळेझाके, अश्वीने ढवळे, आदीची उपस्थिती होती. (वार्ताहर)
महिलांनी केली प्रश्नांची सरबत्ती
By admin | Updated: August 15, 2014 01:34 IST