सूर्यकांत बाळापूरे किल्लारी१९९३ च्या प्रलयंकारी भूकंपानंतर किल्लारी येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू यांच्या प्रयत्नामुळे किल्लारी येथे भूकंप शास्त्र संशोधन केंद्र व वेधशाळा स्थापन करण्यात आली़ मात्र या वेधशाळेतून ना भूकंपाविषयी संशोधन ना जनजागृती़ सध्या ही वेधशाळा प्रेमीयुगुलांचे आश्रयस्थान बनली आहे़ १९९३ पासून किल्लारी व परिसरात शेकडो भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत़ १९९३ च्या भूकंपासारखी तीव्रता नसली तरी भूकंपाच्या सौम्य धक्क्याची मालीका सुरूच आहे़ त्यामुळे भूकंपाविषयी संशोधन व्हावे़ जनतेमध्ये जनजागृती व्हावी़ शिवाय भूकंप कशामुळे होतो, हानी कशी टाळता येईल, यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ़ जनार्दन वाघमारे यांच्या प्रयत्नामुळे किल्लारी येथे ही वेधशाळा स्थापन करण्यात आली़ वेधशाळेसाठी सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे़ या वेधशाळेत लाखोंची यंत्र सामुग्रीही आहे़ मात्र ही इमारत सध्या कुलूपबंद आहे़ खिडक्यांच्या काचा फुटल्या असून, प्रवेशद्वारही नादुरूस्त झाले आहे़ शिवाय, मोठ्या प्रमाणात कचराही साचला आहे़ एक जुनी वास्तू असल्याची स्थिती या वेधशाळेची झाली आहे़ स्थापनेपासूनच या वेधशाळेत ना शास्त्रज्ञ, ना संशोधनाची स्थिती आहे़ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व राष्ट्रीय भूकंप संशोधन केंद्र हैद्राबाद यांच्या अधिपत्याखाली ही वेधशाळा स्थापन करण्यात आली़ विद्यार्थ्यांनी भूकंप विषयावर संशोधन करावे़ भूकंप होण्याची कारणे काय आहेत, भूकंप होणार असल्याची माहिती कळावी जेणेकरून जीवित व वित्तहानी टाळता येईल, हा हेतू संस्थापक कुलगुरूंचा वेधशाळा स्थापनेमागचा होता़ मात्र सध्यातरी वेधशाळेची ही वास्तू शोभेची वस्तू आहे़ लाखोंची यंत्रसामुग्री धूळखात पडून आहे़ प्रेमीयुगुलांना मात्र ही वास्तू आश्रयस्थान झाली आहे़ या वास्तूमध्ये स्थापनेनंतर भूकंप संशोधनाचे कोणतेही कार्य झाले नाही़ नावालाच वेधशाळा असून, इमारत व वेधशाळेचा फलक मात्र लावण्यात आलेला आहे़ भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरू असताना विद्यापीठ प्रशासनाची मात्र उदासीनता आहे़
किल्लारी भूकंप वेधशाळा बनली शोभेची वस्तू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 00:02 IST