वाळूज महानगर : धर्म फक्त मुखात नव्हे तर ह्दयात बसविण्याची गरज असल्याचे प्रबोधन युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज यांनी मंगळवारी बजाजनगरात आयोजित कार्यक्रमात केले. भाविकांना चांगले जीवन जगण्याचा संदेश त्यांनी दिला.
आगम रत्नाकर युवाचार्य महेंद्र ऋषीजी महाराज यांचे उद्योगनगरीत आगमन होताच जैन समाज बांधवांच्यावतीने त्यांचे पंढरपुरातील तिरंगा चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर भाविकांच्या उपस्थितीत महेंद्रऋषीजी महाराज यांनी बजाजनगरातील जैन स्थानकाकडे प्रस्थान केले. तत्पूर्वी पंढरपुरातील महावीर चौकात महामांगलिकचा कार्यक्रम घेण्यात आला.
आपल्या प्रवचानात महेंद्र ऋषीजी महाराज म्हणाले की, धर्म ही मनुष्य जीवनाच्या सार्थकतेचा प्रमुख अंग आहे. धर्मशिक्षा व धर्माचे आचरण मनापासून केले तरच अनमोल मनुष्य जीवन सार्थक होते. आजघडीला धर्म फक्त दिखाव्यासाठी केला जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. धर्म साधना जप, तप काहीही करा पण तो हद्यापासुन करा असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाला उपप्रवर्तक अक्षय ऋषीजी मसा, हितेंद्र ऋषीजी मसा, अमृतमुनीजी मसा, डॉ. अचल ऋषीजी मसा व उपप्रवर्तनी साध्वी सुमन प्रभाजी आदींची उपस्थिती होती. या धार्मिक कार्यक्रमाला बजाजनगर, पंढरपूर, वाळूज, रांजणगाव, सिडको वाळूजमहानगर व शहरातील जैन समाजबांधव व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बजाजनगरात दीक्षा दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम
महेंद्र ऋषीजी महाराज यांच्या ४० व्या दीक्षा दिनाचे औचित्य साधून उद्या बुधवारी सकाळी ९ वाजता बजाजनगरातील जैन स्थानकांच्या विस्तारित नवीन भवनाच्या बांधकामाचे भूमिपुजन महेंद्र ऋषीजी महाराज यांच्या हस्ते केले जाणार असून त्यानंतर प्रवचन होणार आहे.
फोटो ओळ- बजाजनगरात प्रवचन करताना महेंद्रऋषीजी महाराज. समोर उपस्थित जैन समाजबांधव.