छत्रपती संभाजीनगर : पाच वर्षांनी पुन्हा एकदा शहरात अवैध गर्भलिंगनिदान रॅकेटची मोठी साखळीच उघडकीस आली आहे. रविवारी गारखेड्यात गर्भलिंगनिदान केंद्र चालवणाऱ्या सविता थोरात, तिची मुलगी साक्षी या गर्भलिंगनिदान व गर्भपातासाठी कुख्यात असलेल्या सतीश सोनवणे याच्या सातत्याने संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या घरात आढळलेले लॅपटॉप व टॅब देखील त्याचेच असल्याचे साक्षीने कबूल केले. शिवाय, त्यांच्याकडील सात मोबाइलपैकी २ मोबाइलही त्याचेच आहेत. सोनवणे यापूर्वी बीड, जालन्यात गर्भलिंगनिदान व गर्भपाताचे मोठे रॅकेट चालवायचा. त्या प्रकरणात त्याच्यावर चार गंभीर गुन्हे दाखल असल्याने पुन्हा एकदा गर्भलिंगनिदान रॅकेटचे धागेदोरे बीडच्या दिशेने जात आहेत.
रविवारी मनपा व पुंडलिकनगर पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले. शहराच्या मध्यवर्ती भागात भर दिवसा हा प्रकार राजरोस चालायचा. २०२३ मध्ये उघडकीस आलेल्या गर्भपात रॅकेटमध्ये सविता, साक्षी या मायलेकी आरोपी होत्या. त्यातून बाहेर येताच दोघी पुन्हा सक्रिय झाल्या. पुंडलिकनगरचे निरीक्षक राजेश यादव यांनी नुकतीच बेगमपुरा पोलिसांकडून त्या गुन्ह्याची माहिती मागवली. १७ मेपर्यंत पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींचे शहरात अनेक एजंट आहेत. त्यांचे एजंटच रुग्णांसोबत संपर्क साधून थेट सवितापर्यंत पोहोचवत. सर्व व्यवहार नगद होई. सविताकडे सापडलेले १२ लाख रुपये असेच कमावल्याचा संशय पोलिसांना आहे.
आज टॅब, लॅपटॉप उघडणार, अनेक सोनोग्राफीच्या कॉपीसविताकडे एक लॅपटॉप, एक टॅब सापडला. सोनोग्राफी यंत्र, प्रोबद्वारे या टॅबला कनेक्ट करून चाचणी करायचे. त्यात आतापर्यंत केलेल्या सोनोग्राफीच्या अनेक कॉपी (छायाचित्रे) आहेत. मनपाने या वस्तू पोलिसांना दिल्या. पोलिस मनपा पथकाच्या उपस्थितीत तो उघडून तपासणी करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यात अनेक अशा कॉपीज असून उघडल्यानंतरच टेस्टचा आकडा स्पष्ट होईल.
सोनवणेमुळे गांभीर्य वाढले-गर्भलिंगनिदान व गर्भपातासाठी कुख्यात असलेल्या सोनवणेमुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. ३१ जानेवारी रोजी वाळूजच्या गर्भपात रॅकेटमध्ये उपनिरीक्षक शंकर शिरसाठ यांनी त्याला सबळ पुराव्यांसह अटक केली. बीड पोलिसांनी त्यानंतर त्याला ताब्यात घेतले होते.-एमबीबीएस असलेल्या डॉ. सोनवणेने तामिळनाडूतून रेडिओलॉजीचे शिक्षण घेतले. जून २०२२ मध्ये पहिल्यांदा बीडच्या गर्भपाताच्या रॅकेटमध्ये त्याचे नाव समोर आले. त्यात जामिनावर सुटल्यानंतर त्याने वाळूजमध्ये रॅकेट सुरू केले.- उपनिरीक्षक शंकर शिरसाठ यांनी सोनवणे एका ट्रिमरच्या आकाराच्या सोनोग्राफीच्या यंत्राच्या मदतीने गर्भतपासणी करत असल्याचे निष्पन्न केले होते. - सविता, साक्षी तीच पद्धत वापरतात. ते हे सर्व साहित्य ऑनलाइन ऑर्डर करतात. त्यामुळे सोनवणेनेच त्यांना प्रशिक्षण दिल्याचा संशय आहे. त्याचे काही साहित्यही तेथेच आढळल्याने त्याची चौकशी महत्त्वाची असून त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले जाईल, असे निरीक्षक राजेश यादव यांनी स्पष्ट केले.
एजंट पकडलागर्भलिंग निदान रॅकेटसाठी सविताला ग्राहक आणून देणाऱ्या सतीश टेहरे या एजंटाला पकडण्यात पुंडलिकनगर पोलिसांना यश आले. निरीक्षक राजेश यादव यांचे पथक दोन दिवसांपासून एजंटच्या शोधात आहे. त्यातील पहिली कडी मंगळवारी रात्री हाती लागल्यानंतर सतीशला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्याला १७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून अन्य एजंटांचा शोध सुरू आहे.