अहमदपूर : अहमदपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ललिता पुणे तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे कलिमोद्दीन अहेमद शेख यांची बिनविरोध निवड झाली. नगरपालिकेच्या सभागृहात पिठासीन अधिकारी स्वाती शेंडे यांनी या दोघांच्याही बिनविरोध निवडीची गुरुवारी घोषणा केली. अहमदपूर पालिकेत एकूण २० नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे १२, काँग्रेसचे ४, शिवसेनेचे २, भाजपा १ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. तत्कालीन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची मुदत संपल्याने गुरुवारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. नगराध्यक्षपदाच्या निवडीत राष्ट्रवादीच्या मिनाक्षी शिंगडे, काँग्रेसच्या खाजाबेगम अहेमद हकीम शेख यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ललिता वैजनाथअप्पा पुणे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध वर्णी लागली. तर उपनगराध्यक्षपदासाठी ५ सदस्यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. सेनेच्या वतीने बालासाहेब लखनगिरे, काँग्रेसकडून कलिमोद्दीन शेख अहेमद, राष्ट्रवादीचे डॉ. सिद्धार्थ सूर्यवंशी, मुजिब पटेल जहागीरदार आणि मिनाक्षी शिंगडे यांचा समावेश होता. अर्ज परत घेण्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात राजकीय खलबते झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती संख्याबळ असतानाही काँग्रेसचे कलिमोद्दीन अहेमद शेख बिनविरोध निवडून आले. चौघा जणांनी नामनिर्देशनपत्र परत घेतल्याने कलिमोद्दीन शेख यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. (वार्ताहर)
नगराध्यक्षपदी पुणे, तर उपाध्यक्षपदी शेख
By admin | Updated: August 15, 2014 01:33 IST