लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : गत खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन वाढल्याने बाजार समितीत आवकही वाढली होती़ परिणामी दर कोसळले़ त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने प्रति क्विंटल २०० रूपयांचे अनुदान जाहीर करून त्यासाठी प्रस्ताव मागविले होते़ परंतु, तीन महिने उलटले तरी जिल्ह्यातील ६० हजार ९५१ शेतकऱ्यांचे १९ कोटी ५२ लाख २९ हजार ८७ रूपये अनुदानाचे प्रस्ताव तालुकास्तरीय समितीच्या छाननीतच अडकले आहेत़गेल्या वर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला़ ऐन पेरणीच्या वेळी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्याने सर्वाधिक सोयाबीनचा पेरा केला होता़ त्यामुळे उत्पादनातही भरघोस वाढ झाली़ दरम्यान, राशी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी बाजार समितीत आणण्यास सुरूवात केली असता शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने सौदे होऊ लागले़ त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी, लागवडीचा खर्चही पदरी पडेना़ आर्थिक संकटात सापडलेल्या सोयाबीन उत्पादकांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासनाने प्रति क्विंटल २०० रूपयांचे अनुदान जाहीर केले़आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बाजार समितीत विक्री केलेल्या सोयाबीनला अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले़ त्यानुसार जिल्ह्यातील ११ पैकी ९ बाजार समितीत विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले़ या प्रस्तावाची जबाबदारी बाजार समितीकडे सोपविण्यात आली होती़ जिल्ह्यातील नऊ बाजार समित्यांनी मुदतीत प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे सादर केले़ मात्र या समितीच्या छाननीतच हे प्रस्ताव अडकून पडले आहेत़
१९ कोटींच्या अनुदानाचे प्रस्ताव छाननीतच!
By admin | Updated: May 20, 2017 23:41 IST