उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघा चोवीस तासांचा अवधी राहिला असून, गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या आहेत. बुधवारी सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. तत्पूर्वी पुढील चोवीस तासांत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून ‘गुपचूप’ प्रचारयंत्रणा राबविली जाणार आहे. दरम्यान, या कालावधीत कुठेही पैसे वाटपासारखे गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी आचारसंहिता पथक करडी नजर ठेऊन आहे. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकीचे वातावरण तापत होते. विद्यमान आमदारांसोबतच तिकिटाची खात्री असलेल्या काही उमेदवारांनीही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून मतदारांशी संपर्क वाढवून निवडणुकीची जय्यत तयारी केली होती. १२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी केल्यानंतर प्रचारयंत्रणेला अधिक गती आली. गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावा-गावात जाऊन पदयात्रा, रॅली व मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराची राळ उडवून दिली होती. या निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तुळजापूरला केंद्रबिंदू मानून जिल्ह्यातील प्रचारयंत्रणा राबविली. श्री क्षेत्र तुळजापुरात भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाध्यक्ष शरद पवार, काँग्रेसकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर शिवसेनेच्या वतीने पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जंगी सभा झाल्या. तसेच परंडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजीत पवार, भाजपाच्या वतीने रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर, तसेच पंकजा मुंडे तर कळंब येथे कळंब राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे व शिवसेनेकडून अमोल कोल्हे या स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या. याशिवाय त्या-त्या पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सभा, पदयात्रांनी चारही मतदारसंघ ढवळून निघाले. अधिसूचना जाहीर झाल्यानंतर महायुती आणि आघाडीमधील जागा वाटपावरून सुरू झालेला घोळ बरेच दिवस चालला. त्यामुळे आघाडी, युती राहते की तुटते, याबाबत सुरूवातीचे काही दिवस चांगलीच चर्चा रंगली होती. शिवाय इच्छूक उमेदवारांतही संभ्रमावस्था होती. अशा परिस्थितीतच जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात विविध पक्ष तसेच अपक्ष अशा शंभराहून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अखेर आघाडी आणि युतीतील सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्याही वाढली. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर चार विधानसभा मतदारसंघात एकूण ५६ उमेदवार रिंगणात राहिले. यात उमरगा आणि तुळजापूर या दोन मतदारसंघात प्रत्येकी १३, परंडा मतदार संघात दहा तर उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात मात्र मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्य पक्षाचे सहा, नोंदणीकृत पक्षाचे सहा आणि अपक्ष आठ अशा वीस उमेदवारांचा समावेश आहे. जिल्ह्यात चार विधानभा मतदार संघात १२ लाख ३४ हजार ४९० मतदार आहेत. मतदार नोंदणी अभियानांतर्गत जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात १४ हजार १९ मतदारांची नव्याने नोंद झाली आहे. एकूण मतदारांमध्ये ६ लाख ६२ हजार ८५३ पुरुष तर ५ लाख ६९ हजार ६२३ महिला व १४ इतर मतदारांचा समावेश आहे. तुळजापूर मतदारसंघामध्ये १ लाख ७८ हजार ५२३ पुरूष व १ लाख ५१ हजार ६३५ महिला आणि सात इतर मतदार आहेत. उमरगा विधानसभा मतदार संघामध्ये १ लाख ५० हजार ९१३ पुरूष १ लाख ३० हजार ७६३ महिला आणि चार इतर मतदारांचा समावेश आहे. उस्मानाबादमध्ये १ लाख ७४ हजार ९८१ पुरुष, १ लाख ५१ हजार ४०४ महिला व दोन इतर तर परंडा मतदारसंघामध्ये पुरूष मतदारांची संख्या १ लाख ५८ हजार ४३६ तर १ लाख ३५ हजार ८२१ महिला मतदार आहेत. इतर मतदारांची संख्या एक इतकी आहे.
प्रचाराची बोलती बंद !
By admin | Updated: October 14, 2014 00:33 IST