औरंगाबाद : भारतीय जनता पक्षात शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीवरून अंतर्गत गटबाजीला उधाण झाले आहे. प्रदेशाध्यक्षांच्या अटोकाट प्रयत्नानंतरही दोन्ही पदांसाठी नावांवर स्थानिक पदाधिकारी राजी झालेले नाहीत. त्यामुळे आता ही निवडच लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी प्रदेशाध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळे आता या निवडीनंतरच औरंगाबादच्या शहर आणि जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर केली जाणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.राज्यात महिनाभरापासून भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार चार दिवसांपूर्वीच शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली. शहराध्यक्षपदासाठी संजय केणेकर, अनिल मकरिये, विजय साळवे, संजय जोशी, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांच्यासह सेनेतून भाजपमध्ये आलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी हेही इच्छुक आहेत. शहराध्यक्षांची निवड जाहीर करण्यासाठी शुक्रवारी कलश मंगल कार्यालयात दुपारी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती, पण त्याआधीच तनवाणी यांची नियुक्ती निश्चित झाल्याची कुणकुण शहरातील पदाधिकाऱ्यांना लागली. त्यामुळे पक्षाच्या बहुतांश आजी आणि माजी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन त्या विरोधात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे धाव घेतली. पक्षात नव्याने आलेल्यांनाच सर्व पदे वाटल्यास पक्षातील निष्ठावंतांनी काय करायचे, असा सवाल या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांना विचारला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दानवे यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही नावावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे शेवटी प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी शुक्रवारी शहराध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करायला लावला.