परभणी: धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीस विरोध करणाऱ्या मधुकर पिचड आणि पद्माकर वळवी या मंत्र्यांचा गुरुवारी निषेध करण्यात आला. धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले.राज्यात पशूपालन व शेळ्या-मेंढ्याचे कळप घेऊन डोंगरदऱ्यात रानोमाळ हिंडणारी धनगर ही जमात असून भारतीय संविधानातील अनुच्छेद ३४२ नुसार व रिपोर्ट आॅफ द कमिशन १९५१ नुसार देशातील अनेक राज्यात धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये आहे. परंतु, आपल्या राज्यातील आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड व पद्माकर वळवी हे आरक्षण अंमलबजावणीस जाणीवपूर्वक विरोध करीत असल्याने या मंत्र्यांचा धनगर समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षणाचा हक्क नाकारणाऱ्यांना कदापीही माप केले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनामध्ये धनगर समाज आरक्षण कृती समितीचे बबन मुळे, दिलीप तिडके, सुरेश भूमरे, अॅड.भोजाजी बनसोडे, के.टी. चांदणे, बाळासाहेब ढोले, विठ्ठलराव वडकुते, विलास लुबाळे, मदन दुगाने, रामकिशन गरगडे, तुळशीराम गिराम, सचिन गारुडी, गणेश मुळे, कैलास खनपटे, केशव शेळके, राजेश बालटकर यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंत्र्यांचा निषेध
By admin | Updated: July 25, 2014 00:27 IST