जालना : गेवराई (जि.बीड) येथील मटका बुक्की राहुल उर्फ जिजा शंकरराव खंडागळे हा अंबडला कल्याण, मुंबई व सुपर मिलन नावाचा जुगार खेळवित होता. त्याच्या पाच साथीदारांना पकडण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई २२ जून रोजी रात्री ८ वाजता करण्यात आली. मुख्य आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. गेवराई येथे राहत असलेला राहुल खंडागळे हा काही दिवसांपासून अंबड येथे कल्याण, मुंबई व सुपर मिलन नावाचा मटका जुगार खेळवित होता. त्यासाठी त्याने अंबड येथे एजंटही नेमले होते. या एजंटांना या कामाचे कमिशन देत होता. त्याला एजंट म्हणून शाम धोंडिराम काकडे, सतीश उत्तमराव कानगुडे या दोन आरोपींना हाताशी धरून आपेगाव (ता.अंबड) येथील शिवाजी शंकर चौधरी, इंदिरानगर (अंबड) येथील नंदू मोतीलाल मासोळे व नूतन वसाहत (अंबड) येथील नारायण जिजाबा पिराणे यांना सोबत घेऊन मुख्य आरोपी राहुल खंडागळे याच्यासाठी काम करीत होता. २२ जून रोजी रात्री ८ वाजता खंडागळेसह सर्वच पाच आरोपी मटका जुगार खेळविल्यानंतर मत्स्योदरीदेवी मंदिराच्या प्रांगणात जुगार खेळ खेळविल्यानंतर आलेल्या पैशाचा हिशोब मुख्य आरोपीला देण्यासाठी एकत्र जमले होते. काही जणांना याठिकाणी मटका जुगार खेळवित असतानाच विशेष कृती दलाच्या पथकाने छापा मारला. पोलिसांनी घेरल्याचे लक्षात येताच सर्वकाही जागीच सोडून राहुल खंडागळे हा पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र अन्य पाच आरोपींना सहायक पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, जमादार विनायक कोकणे, संजय गवई, फुलचंद हजारे, विनोद गडदे, सुनील म्हस्के, संदीप चिंचोले, खलील शेख आदींनी पकडले. अड्ड्याची माहिती पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांना खबऱ्याने दिली होती. त्याची चार दिवसांपासून पोलिसांनी शहानिशा केली. मुख्य आरोपी अड्ड्यावर आल्यानंतर पोलिसांनी छापा मारला. या कारवाईसाठी सिंह यांच्यासह पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
अंबड येथे मटका अड्ड्यावर छापा
By admin | Updated: June 24, 2014 00:20 IST